वीजतारांचा स्पर्श होऊन आंबेवाडीत उसाला आग
बेळगाव : वीजतारांचा स्पर्श होऊन 30 गुंठ्यातील ऊस जळाल्याची घटना आंबेवाडी येथे बुधवारी घडली. यामुळे शेतकरी भावकू चांगो कलगोंडा यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत ही घटना घडल्याने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे. हेस्कॉमने याची दखल घेऊन तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. आंबेवाडी येथील शेतकरी भावकू कलगोंडा यांच्या गावाशेजारी असणाऱ्या भरमाच्या शेतवडीत ही घटना घडली आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मापक प्रमाणात असणाऱ्या पाण्याच्या आधारावर उसाचे पीक घेण्यात आले होते. शेतवडीतून गेलेल्या वीजखांबांच्या तारांचा स्पर्श उसाला झाल्याने ही घटना घडली आहे. हेस्कॉमकडे या भागातील शेतकऱ्यांकडून लोंबकळणाऱ्या वीजतारांचा प्रश्न अनेकवेळा मांडण्यात आला. मात्र हेस्कॉमकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. या घटनेमुळे भावकू यांना दीड लाखाचा फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी वीणा यांनी पंचनामा केला. भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली असून हेस्कॉमने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.









