कोल्हापूर / धीरज बरगे :
कोल्हापूर विभागात ऊस पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली तरी साखर उत्पादनात मात्र घट झाली आहे. गतवर्षी 2023-24 च्या हंगामात 31 जानेवारी अखेर विभागात 18 लाख 00091 मेट्रीक टन साखर उत्पादन झाले होते. तर यंदाच्या हंगामात 15 लाख 65 हजार 913 इतके उत्पादन झाले आहे. आकडेवारीनुसार 2 लाख 34 हजार 178 मेट्रीक टन इतकी साखर उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन घटीचा फटका शेतकऱ्यांसह कारखानदारांना बसणार आहे.
नैसर्गिक असमतोलाचा फटका यंदा ऊस उत्पादकांना बसला आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. प्रदीर्घ काळ पडणारा पाऊस, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावर होत आहे. पावसाळ्यात महापूर काळात पुराचे पाणी गतीने पसरते, मात्र ओसरताना ते संथ गतीने ओसरते. त्यामुळे शेतामध्ये फार काळ पाणी साचून राहिल्याने उसाची वाढ खुंटते, उतारा कमी येतो.
उसाला तुरेही लवकर आल्याने केवळ उसाची वाढ झाली, मात्र हेक्टरी उत्पादनात घट झाली. या सर्व बाबींचा यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील साखरेचा उतारा घटल्याने साखर उत्पादनातही घट झाली आहे.
- जिल्ह्यात 1.72 लाख मेट्रीक टन घट
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात 1.72 लाख मेट्रीक टन घट झाली आहे. 2023-24 च्या हंगामात जिल्ह्यात 31 जानेवारीअखेर साखरेचे 11 लाख 62 हजार 597 मेट्रीक टन इतके उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात 9 लाख 90 हजार 410 मेट्रीक टन इतके उत्पादन झाले आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षीच्या हंगामात 6 लाख 37 हजार 493 इतके उत्पादन झाले होते. तर यंदा 5 लाख 75 हजार 503 मेट्रीक टन इतके उत्पादन झाले आहे. सांगली जिल्ह्यातही साखर उत्पादनात 61 हजार 990 मेट्रीक टन इतकी घट झाली आहे.
- सात कारखान्यांच्या उत्पादनात वाढ
जिल्ह्यातील 23 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांपैकी केवळ सात कारखान्यांच्या साखर उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. यामध्ये आजरा, दत्त शिरोळ, जवाहर हुपरी, तात्यासाहेब कोरे वारणानगर, अथणी शुगर्स बांबवडे, अथर्व, अथणी शुगर्स भुदरगड यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कारखान्यांच्या साखर उत्पादनात फारशी वाढ नाही. केवळ वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कारखान्याच्या उत्पादनात सर्वाधिक 17 हजार 837 मेट्रीक टन इतकी वाढ झाली आहे.
- सरासरी पाच ते दहा हजार मेट्रीक टन घट
साखर उत्पादनात घट असलेल्या 16 कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांच्या साखर उत्पादनात सरासरी 5 ते 10 हजार मेट्रीक टन इतकी घट दिसून येत आहे. छत्रपती शाहू कागल, दालमिया आसुर्ले–पोर्ले, ओलम राजगोळी चंदगड, सरसेनापती संताजी घोरपडे बेलेवाडी काळम्मा, कागल आदी साखर कारखान्यांच्या साखर उत्पादनात दहा हजार मेट्रीक टनांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे.
- 2023-24 आणि 2024-25 मधील साखर उत्पादन असे
कारखाना साखर उत्पादन (मेट्रीक टन)
2023-24 2024-25
आजरा 23645 27361
भोगावती 36075 32961
छ. राजाराम, क.बावडा 30623 25925
छ. शाहू, कागल 70970 46830
श्री दत्त, शिरोळ 74513 75948
दूधगंगा, वेदगंगा बिद्री 67415 61695
जवाहर हुपरी 110516 119460
मंडलिक, हमिदवाडा 35450 25570
कुंभी–कासारी, कुडीत्रे 47138 40134
पंचगंगा, इचलकरंजी 58187 58116
शरद, नरंदे 35395 33995
तात्यासाहेब कोरे, वारणानगर 77060 94897
अथणी शुगर, सोनवडे–बांबवडे 34849 37447
डॉ. डी. वाय. पाटील, गगनबावडा 41720 35845
अथर्व, हलकर्णी, चंदगड 33452 33638
अप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज 95780 9267
दालमिया, आसुर्ले–पोर्ले 77794 58099
गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी 37110 36616
इको–केन म्हाळुंगे, चंदगड 28617 18060
ओलम राजगोळी, चंदगड 51340 38137
संताजी घोरपडे, कागल 51310 32977
ओंकार शुगर फराळे, राधानगरी 17380 17399
अथणी शुगर, भुदरगड 26617 30095
एकूण 1162597 990410








