जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत सूचना : मागील हंगामातील अतिरिक्त दरही न दिल्याने शेतकऱ्यांवर अन्याय
बेळगाव : ऊस दराची घोषणा करण्याआधीच काही कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी कारखानदारांना दर जाहीर करण्यासंबंधी सूचनाही करण्यात आली होती. सध्या हंगाम सुरू केलेल्या व यापुढे सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नितेश पाटील यांनी केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना वरील सूचना केली आहे. 1 नोव्हेंबरनंतर गाळप सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, सरकारची परवानगी घेऊन काही कारखान्यांनी त्याआधीच गाळप सुरू केले आहे. एफआरपीप्रमाणे ऊसदर मात्र जाहीर करण्यात आलेला नाही.
गेल्या हंगामातील अतिरिक्त दर देण्याचीही सूचना
गेल्या हंगामात जाहीर केलेला अतिरिक्त दर शेतकऱ्यांना देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून काही कारखान्यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेला दर अद्याप दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. हंगाम सुरू करण्याआधीच ऊसदर निश्चित करावा. यासंबंधी शेतकऱ्यांना माहिती देऊनच कारखाना सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना केली आहे.
कारखान्यांना अचानक भेटी देऊन पाहणी करा
नियमानुसार ऊसपुरवठा केल्यानंतर पंधरा दिवसात संबंधित शेतकऱ्यांना बिले दिली पाहिजेत. वजन व्यवस्था पारदर्शक असली पाहिजे. वजनकाट्यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारखान्यांना अचानक भेटी देऊन पहाणी करावी. महसूल, पोलीस आदींचा समावेश असलेल्या पथकांची प्रत्येक तालुक्यात स्थापना करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुखांची नाराजी
या आधीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ऊसदर जाहीर करायला हवा होता. मात्र, काही कारखान्यांनी दर जाहीर करण्याआधीच गाळप सुरू केले आहे, असे सांगत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अन्न व नागरीपुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, वजनमाप खात्याचे अधिकारी व जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.









