कोल्हापूर / कृष्णात चौगले :
यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. खरीप पेरणीसाठी अनुकूल वातावरणाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण मे महिन्यात झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप पेरणी ठप्प झाली होती. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
पेरणीयोग्य तयार झालेल्या शेतजमिनीत सध्या पेरणी सुरु झाली आहे. कृषी विभागाने महाबीज कंपनीकडून भाताचे 1 हजार 536, सोयाबीनचे 1 हजार 154 क्विंटल बियाणे उपलब्ध केले आहे. तर 20 हजार 371 क्विंटल खासगी बियाणे उपलब्ध आहे. पेरणीसाठी एकूण 22 हजार 841 क्विंटल बियाणे शिल्लक आहे.
ऐनवेळी बियाणांसाठी शेतकऱ्यांची धांदल उडते. हे टाळण्यासाठी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे, खते देण्याची व्यवस्था केली आहे. जिह्यात ज्वारी व मका पिकांचे बियाणे बदलाचे प्रमाण 100 टक्के आहे. तर भात 48, तूर 35, मूग 22, उडीद 35, भुईमूग 4, नाचणी 12 आणि सोयाबीन पिकाचे बियाणे 35 टक्के प्रमाणात बदलले जाते. म्हणजेच 22 हजार 923 क्विंटल बियाण्याची गरज आहे. यामध्ये ‘महाबीज’कडून 2789 क्विंटल तर 20 हजार 371 क्विंटल खासगी माध्यमातून उपलब्ध आहे.
- भात पिकाचे सर्वाधिक क्षेत्र
खरीप हंगाम सन 2025 मध्ये जिह्यातील 2 लाख 5 हजार 338 हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली येईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामध्ये सर्वाधिक 1 लाख 19 हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. तर ज्वारी 600 हेक्टर, तूर 600, मूग 800, उडीद 1100, भुईमुग 39000, मका 200, नाचणी 19 हजार 600, सोयाबीन 41 हजार 400 हेक्टर क्षेत्र आहे.
- शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
खरीप पेरणीच्या अनुषंगाने जिह्यात पुरेसे बि–बियाणे आणि रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची आणखी काही दिवस उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी.
– जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
- खरीप पिकांचे उत्पादन (उत्पादन किलो / प्रतिहेक्टरी )
पिकाचे नाव 2024-25 (साध्य) 2025-26 (लक्षांक)
भात 3492 4076
ख.ज्वारी 10 10
नागली 427 647
मका 06 07
ए.क.धान्ये 21 41
भूईमूग 711 850
सोयाबीन 1090 1134
ऊस 179424 (टन) 198600 (़टन)
- खरीप हंगाम बियाणे नियोजन
पीक सरासरी क्षेत्र (हेक्टर) उपलब्ध बियाणे
महाबीज खासगी एकूण
ज्वारी 700 0 50 50
भात 90600 1536 14084 15620
तूर 556 2 30 32
मूग 723 0 25 25
उडीद 969 10 50 60
भूईमुग 29000 0 1420 1420
मका 200 0 70 70
नाचणी 16300 0 110 110
सोयाबीन 41400 1454 4300 5454
एकूण 192500 2789 20371 22841
- उपलब्ध रासायनिक खत
खतांचे नाव एकूण शिल्लक खत साठा (मे.टन)
यूरिया 14696
डीएपी 1325
एमओपी 5701
संयुक्त खते 28814
एसएसपी 5481
कंपोस्ट 3
एफओएम 141
एकूण 56161








