कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन 2024-25 रब्बी हंगामामध्ये जिह्यासाठी खतांची उपलब्धता व वाटपाबाबत नियोजन केले असून मंजूर आवंटनाप्रमाणे जिह्यात खताची पुरेशी उपलब्धतता केल्याची माहिती मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे यांनी दिली. पण कृषी विभागाने ही कागदोपत्री आकडेवारी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र जिह्यात युरियासह 10:26:26 सारख्या संयुक्त खतांची टंचाई आहे. त्यामुळे पिकांना खतांची मात्रा द्यायची कशी ? या विवंचनेत शेतकरी आहेत.
जि.प.च्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामातील मंजूर आवंटन मेट्रिक टनामध्ये – युरिया 55649 (21446), डिएपी 13263 (10038), एमओपी 11449 (10583), संयुक्त खते 51460 (38778), एसएसपी 31824 (14051), एकूण खते 163645 (122423) टन याप्रमाणे आहे. या खतापैकी 8 फेब्रुवारी अखेर जिह्यामध्ये शिल्लक खतसाठा– युरिया 21446, डिएपी 2521, एमओपी 5131, संयुक्त खते 20775, एसएसपी 6486 अशी एकूण शिल्लक खते 56414 मेट्रिक टन आहे. कृषी विभागाने ही आकडेवारी दिली असली तरी प्रत्यक्ष कृषी दुकानांमध्ये अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यास साठा नाही असेच उत्तर येईल. कारण कृषी विभागाकडून वारंवार साठा उपलब्ध असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी खते मिळत नसल्याचे वास्तव आहे. अनेक शेतकरी डिएपीसह पोटॅश आणि फॉस्फेट घेऊन त्यामध्ये युरियाची मिसळून स्वत: संयुक्त खतांची मात्रा तयार करतात. पण यासाठी युरिया खत गेले महिना ते दीड महिन्यांपासून उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
- चौकशी आणि कारवाईचा कृषी विभागाकडून फार्स
कृषि विभागाने जिह्यातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना तक्रारीच्या अनुषंगाने कृषि निविष्ठा विक्रेत्याच्या तपासण्या सुरू आहेत. त्या अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 13 भरारी पथकामार्फत तपासण्या सुरू आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईबाबत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी आदेशित केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. पण लिकिंगच्या सक्तीमुळे खतांच्या टंचाईस जबाबदार असलेल्या किती खत कंपन्यावर आजपर्यंत कृषी विभागाने कारवाई केली हा संशोधनाचा विषय आहे.
- पॉस मशीनवर युरियाचा 27 हजार टन कागदोपत्री साठा शिल्लक
काही महिन्यांपासून खाजगी कृषी दुकानदारांसह सहकारी संस्थांनी युरिया खतांच्या विक्रीबाबत पॉस मशीनवर नोंदणी केली नसल्यामुळे मशीनवर युरिया खताचा 27 हजार मेट्रिक टन कागदोपत्री साठा शिल्लक आहे. खत खरेदीसाठी येताना अनेक शेतकरी आधारकार्ड घेऊन येत नाहीत. त्यामुळे पॉस मशीनवर खत खरेदीची नोंद होत नाही. परिणामी पॉस मशीनवर खतांचा शिल्लक साठा कमी होत नसून तो ‘जैसे थे’ राहतो. त्यामुळे जिह्यात 21 हजार 446 इतका युरियाचा आणि 20 हजार 775 मेट्रिक टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र खतांची टंचाई कायम आहे.
विनोद पाटील, जिल्हाध्यक्ष, असो. ऑफ कोल्हापूर बि–बियाणे, किटकनाशके व खते व्यापारी संघटना
- औद्योगिक वापरासाठी युरियाची विक्री होत असल्याचा आरोप
जिह्यात 3 हजार कृषी दुकानदारांकडे पॉस मशीन आहे. त्यापैकी 1 हजार दुकाने बंद आहेत. तरीही संबंधित यंत्रणेकडून या बंद मशीनवर युरियाचा साठा नेंदवून त्याची औद्योगिक कारणासाठी विक्री केली जात असल्याचा अनेक कृषी दुकनादारांचा आरोप होत आहे.
- कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे केवळ कागदोपत्री कामकाज
जिह्यात पुरेसा युरिया आणि अन्य खतांचा साठा शिल्लक आहे असे म्हणणारे कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ कागदोपत्रीच कामकाज करत असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या म्हणण्यानुसार जर पुरेसा खत साठा शिल्लक असेल तर आवश्यक खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी दुकानांचे उंबरठे झिजवावे लागले नसते.








