बीएसएनएल धारक नेटवर्कच्या प्रतिक्षेत
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही सेवा कोलमडली आहे. त्यामुळे बीएसएनएल धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
दोडामार्ग तालुका डोंगराळ असल्याने तालुक्यातील सर्वच गावात बीएसएनएलची सेवा मिळते. मात्र मागील दोन दिवसांपासून ही सेवा पुरती कोलमडली आहे. नेटवर्क नसल्याने आपत्तीच्या प्रसंगी फोन करणे देखील मुश्किल बनले आहे. याबाबत संबंधित विभागाला वारंवार कल्पना देऊनही कानाडोळा केला जात आहे. कोलमडलेल्या सेवेमुळे बीएसएनएल धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. ही सेवा सुरळीत करून बीएसएनएल धारकांची परवड दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.