भारताची भिस्त सिंधू, प्रणॉय, लक्ष्य सेनवर
वृत्तसंस्था / झियामेन (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 च्या सुदीरमन चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे रविवार दि. 27 एप्रिलपासून प्रारंभ होत असून ही स्पर्धा 4 मे पर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत भारताची भिस्त प्रामुख्याने ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर राहिल.
सदर स्पर्धा प्रत्येक दोन वर्षांनी भरविली जाते. ही स्पर्धा मिश्र सांघिक स्वरुपाची आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघाला दुसऱ्या संघाबरोबर पाच सामने खेळावे लागतात. पुरुष, महिला एकेरी, महिला, पुरुष दुहेरी तसेच मिश्र दुहेरी सामन्यांचा यात समावेश आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघात महिलांच्या विभागात 18 वे मानांकित पी. व्ही. सिंधू तसेच अनुपमा उपाध्याय, पुरुषांच्या विभागात 18 वा मानांकित लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांचा समावेश आहे. पुरुष दुहेरीत भारताची अव्वल जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत ए. हरिहरन व रुबेनकुमार भारताचे प्रतिनिधीत्व करतील. महिला दुहेरीत तनिषा क्रेस्टो व प्रिया त्याच प्रमाणे मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-श्रुती मिश्रा, सतीशकुमार-आद्या व्ही. यांचा सहभाग आहे.
सुदीरमन चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा विश्व सांघिक मानांकनावर तसेच खेळाडूंच्या विद्यमान मानांकनाच्या आधारे घेतली जाते. भारतीय संघ हा मानांकनात आठवा असून त्यांचा या स्पर्धेत ड गटात समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये इंडोनेशिया, डेन्मार्क आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. 2011 आणि 2017 साली झालेल्या या स्पर्धेमध्ये भारताची सर्वोच्च कामगिरी झाली होती. भारताने त्यावेळी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 2023 साली चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताला प्राथमिक फेरी पार करता आली नाही. रविवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 देशांचे संघ सहभागी होत असून ते चार गटात विभागण्यात आले आहेत. यजमान चीनने आतापर्यंत ही स्पर्धा 13 वेळा जिंकली आहे.
भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना 27 एप्रिल रोजी डेन्मार्कविरुद्ध, दुसरा सामना 29 एप्रिलला इंडोनेशियाबरोबर, तिसरा सामना 1 मे रोजी इंग्लंडबरोबर होणार आहे. भारताने या स्पर्धेची बाद फेरी गाठली तर त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना शुक्रवार 2 मे रोजी खेळविला जाईल. शनिवार 3 मे रोजी उपांत्य फेरीचे सामने तर रविवार 4 मे रोजी अंतिम सामना होईल.
गट अ – चीन, हाँगकाँग-चायना, थायलंड, अल्जेरीया,
गट ब – द. कोरिया, चीन तैपेई, कॅनडा, झेक
गट क – जपान, मलेशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया
गट ड – भारत, इंडोनेशिया, डेन्मार्क, इंग्लंड









