Sangli News : वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायतील कर्मचार्यांकरीता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने गाडगीळ यांची भेट घेऊन निवेदन दिले, त्यावेळी गाडगीळ बोलत होते.
यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले,आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील इतर सर्वच कर्मचार्यांकरीता शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून करत आहे. 2019 मध्ये शासनानेच नेमलेल्या अभ्यास समितीने याबाबतचा अहवाल दिला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाचे स्वरूप व गरजा लक्षात घेता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करण्याची शिफारस या समितीने केली आहे.
काही दिवसांपूर्वी शासनाने सर्वच असंघटीत क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी महामंडळ जाहीर करून यामध्ये 39 पोटमंडळे गठीत केली आहेत. त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग मिडीया विभागात न करता अन्यच विभागात केला आहे. या महामंडळासाठी सध्या कोणतीही ठोस आर्थिक तरतूद व आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत्र नाहीत. याबाबत निर्णय कधी होणार व निधी मिळणार असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व गर्दीत निधी मिळणे व वृत्तपत्र विक्रेते, कर्मचार्यांना लवकर न्याय मिळणे अवघड वाटत आहे. शासनाने नेमलेल्या वृत्तपत्रविक्रेता कल्याणकारी मंडळ अभ्यास समितीने स्वतंत्र मंडळ करण्याची शिफारस करतानाच आर्थिक स्त्रोत्राचे मार्गही दाखवले आहेत. शासनाला कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही असे मार्ग सुचवले आहेत.वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठीचा अभ्यास समिती अहवाल यावेळी आ. गाडगीळ यांना देण्यात आला.
यावेळी बोलताना गाडगीळ म्हणाले, मागणी रास्त आहे. सर्वच कामगारांची जबाबदारी जे-ते उद्योजक, व्यवसायक घेत असतात, सरकार त्यासाठी संबधितांना भाग पाडते. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्रातील कर्मचार्यांना न्याय मिळायला हवा. आपण कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठुपरावा करू असे आश्वासन या शिष्टमंडळास दिले.
यावेळी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएनशचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर, कार्याध्यक्ष दरिबा बंडगर, सरचिटणीस विशाल रासनकर, कोषाध्यक्ष अमोल साबळे, शहराध्यक्ष सागर घोरपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
…. मग वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वतंत्र का नाही ?
शासन एका बाजुला सर्वांसाठी एकच मंडळ जाहीर करत असताना काही जाती-समाजाच्या नावावर तसेच रिक्षावाल्यांसाठीही स्वतंत्र महामंडळ जाहीर केले आहे. खुद्द कामगार मंत्र्यांनी तरी राज्यातील हॉटेल कामगारांसाठीही स्वतंत्र महामंडळ करण्याची घोषणा केली आहे. मग वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्रे, मिडियामधील कर्मचार्यांसाठीच स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा निर्णय का घेतला जात नाही अशी खंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.








