कुटुंबीयांकडून संशयास्पद मृत्यूची फिर्याद : पत्नी-मेहुण्यावर आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
प्रांताधिकारी कार्यालयातील ग्रेड टू तहसीलदार अशोक संगाप्पा मण्णीकेरी (वय 47) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली असून कॅम्प पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. दिवसभर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अशोक यांची मोठी बहीण गिरिजा संगाप्पा मण्णीकेरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीआरपीसी कलम 174सी अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. गुरुवारी अशोक यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सदाशिवनगर स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवसभर झालेले आरोप-प्रत्यारोप आदींमुळे स्मशानभूमीबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रांताधिकारी कार्यालयात ग्रेड टू तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे अशोक मण्णीकेरी यांना गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास काळी आमराई येथील निवासस्थानी त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी तातडीने खासगी इस्पितळात हलविले. तेथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती मिळताच अशोक यांच्या बहिणी व इतर कुटुंबीयांनी मृत्यू प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. स्वत: पोलिसात फिर्यादही दिली आहे. गुरुवारी कॅम्प पोलीस स्थानकासमोर मोठी गर्दी जमली होती. अशोक यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला नाही, यामध्ये संशय आहे, असे सांगत पत्नी व मेहुण्यावर संशय व्यक्त करण्यात येत होता.
दुपारी पोलीस स्थानकाबाहेर अशोक यांचा मेहुणा आला, त्यावेळी त्याला धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. सायंकाळी सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारावेळी अशोक यांची पत्नी भूमी यांना पोलीस बंदोबस्तात स्मशानात यावे लागले. अशोक यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय साहाय्यक म्हणूनही काम पाहिले आहे. घटनेची माहिती मिळताच खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, कॅम्पचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी खासगी इस्पितळाला भेट देऊन कुटुंबीयांकडून माहिती घेतली. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.









