2 वर्षांच्या गृहयुद्धानंतर देश विभागण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ खार्तूम
सूडानच्या सैन्याने सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धानंतर राजधानी खार्तूममध्ये अध्यक्षीय प्रासादावर कब्जा केल्याची घोषणा केली आहे. सूडानी सैन्याने शुक्रवारी अध्यक्षीय प्रासादावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. सूडानमधील गृहयुद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सूडानचे सैय आता निमलष्करी दल म्हणजेच रॅपिड सपोर्ट फोर्सच्या (आरएसएफ) सदस्यांच्या शोधासाठी अध्यक्षीय प्रासादाच्या आसपासच्या भागांमध्ये मोहीम राबवत आहे. सूदानमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात एकीकडे सूडानचे सैन्य तर दुसरीकडे रॅपिड सपोर्ट फोर्स आहे. देशाच्या सत्तेवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन्ही संरक्षण दलं प्रयत्नशील आहेत. या लढाईत हजारो नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे.
राजधानी खातूर्मच्या अनेक भागांमध्ये गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सूडान गृहयुद्धामुळे देशात अत्यंत धोकादायक मानवीय संकट निर्माण झाले आहे. पूर्ण देशात आजार फैलावले असून सैन्य अन् आरएसएफ दोघांकडून युद्धगुन्हे करण्यात येत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे.
एप्रिल 2023 मध्ये युद्ध सुरू झाल्यावर आरएसएफने अध्यक्षी प्रासादासोबत राजधानीच्या बहुतांश हिस्स्यांवर कब्जा केला होता. परंतु अलिकडच्या महिन्यांमध्ये देशाच्या सैन्याने जोरदार आघाडी उघडत आरएसएफला माघार घेण्यास भाग पाडले आहे. आरएसएफला नाईल नदीच्या दिशेने सरकावे लागत आहे. आरएसएफने चालू वर्षाच्या प्रारंभी सूडानमध्ये समांतर सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती, आरएसएफचा अद्याप राजधानी खार्तंमच्या अनेक भागांसोबत ओमदरमनच्या काही हिस्स्यांसह पश्चिम सूडानवर नियंत्रण आहे.
आरएसएफने काही दिवसांपूर्वी सैन्याच्या ताब्यातून दारफुरला मुक्त करत त्यावर नियंत्रण मिळविले होते. आता आरएसएफकडून सैन्याचा बालेकिल्ला असलेल्या अल-फशीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजधानी खार्तूमवर सैन्याला नियंत्रण मिळाल्यास मध्य सूडानमध्ये जोरदार संघर्ष सुरू होऊ शकतो. यामुळे दोन्ही संरक्षण दलांदरम्यान देशाचे पूर्व-पश्चिम क्षेत्रीय विभाजन होण्याची शक्यता बळावणार आहे. म्हणजेच देश दोन हिस्स्यांमध्ये विभागला जाऊ शकतो.









