साप या सरपटी प्राण्यापासून माणूस नेहमीच दूर रहात आला आहे. सापांची त्याला भीती वाटते. विषारी सापाने दंश केला आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तर भयानक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे साप दिसला तर तो विषारी आहे किंवा नाही याची खात्रीही करुन न घेता त्याला एकतर मारले जाते, किंवा त्याच्यापासून पळ काढला जातो. सापांच्या संदर्भात सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात करण्यात आले असले, तरी बव्हंशी स्थिती अशीच आहे.
तथापि, इंडोनेशियातील एक प्रसिद्ध बेट असणाऱ्या बाली येथे एक व्यक्ती अशी आहे, की जी सापांची भाषा जाणते. ती विषारी सापांनाही जवळ घेऊन त्यांच्याशी संवाद साधू शकते. विषारी नागसापाला हाताळण्यात या व्यक्तीला काहीही भीती किंवा चिंता वाटत नाही. नागसापाशी ही व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा तो सापही हिस हिस्स असे फुत्कार काढत या व्यक्तीशी बोलताना दिसतो. गेल्या 10 वर्षांपून ही व्यक्ती सापांशी अशा प्रकारे संवाद करीत आहे. या व्यक्तीचा एक व्हिडीओही प्रसिद्ध झाला असून तो लक्षावधी लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओत ही व्यक्ती मोठ्या आकाराच्या इंडोनेशियायी नागसापाचे चुंबन घेतानाही दिसून येते. या व्यक्तीचे नाव मिकेल असे असून तो मूळचा फ्रान्सचा आहे. बालपणापासूनच त्याला निसर्गाचे वेड आहे. प्राणी हा त्याचा जणू वीक पॉईंट आहे. विशेषत: सापांसंबंधी आपल्याला कधीही भीती वाटली नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
तसे पाहिल्यास असे सर्पमित्र आपल्याला अनेक दिसून येतात. तथापि, मिकेलचे वैशिष्ट्या असे की तो आपण माणसांशी जसे बोलतो, तसे सापांशी बोलतो. सापांनाही त्याची भाषा समजत असावी, असे हा व्हिडीओ पाहिल्यावर वाटते. हा व्हिडीओ बनावट असावा असे अनुमान काही दर्शकांनी व्यक्त केले आहे. मात्र, या व्यक्तीच्या साहसाची आणि त्याच्या प्राणीप्रेमाची प्रशंसा करणाऱ्यांची संख्याही पुष्कळ आहे. हा व्हिडीओ खरा की खोटा हा मुद्दा अद्याप अनुत्तरित असला, तरी तो खरा असेल तर मात्र, खरोखरच या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय कोणालाही राहवणार नाही. या व्हिडीओला साहजिकच लक्षावधी लाईक्स मिळाले आहेत.









