प्रेमात माणसे आंधळी होतात, असे म्हणण्याचा प्रघात आहे. ब्रिटनमधील ल्यूक विनट्रिप आणि त्याची प्रेयसी सारा यांची कहाणी याचा प्रत्यय आणून देणारी आहे. साराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ल्यूक विनट्रिप याने तिचा इतका ध्यास घेतला होता, की त्याने 2018 पासून आजपर्यंत, म्हणजे गेल्या सात वर्षांमध्ये एकंदर 43 वेळा तिला ’प्रपोज’ केले होते. तथापि, प्रत्येकवेळी त्याने तिचा प्रेमप्रस्ताव नाकारला होता. विनट्रिप याने प्रत्येकवेळी तिला ‘पटविण्या’साठी नवे नवे मार्ग शोधले. अनोख्या युक्त्या उपयोगात आणल्या. प्रत्येक वेळी नवी शक्क्ल उपयोगात आणून तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याला यश आले आहे.
त्याने तिला प्रथम ‘प्रपोज’ केले तेव्हा ते दोघे सहा महिने रिलेशनशिपमध्ये होते. सारा ही एका मार्केटिंग कंपनीत सीईओ आहे. ती प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचेही त्याच्यावर प्रेम होते. पण तिला घाईगडबडीने कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. त्यामुळे ती त्याची विनंती टाळत राहिली होती. ब्रिटनमध्ये ग्रीनविच नामक एक स्थान आहे. या स्थानाचा समय संपूर्ण जगात आधारभूत मानण्यात येतो. या स्थानीही विनट्रिप याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. ज्या स्थानाला सारे जग आधारभूत मानते तेथे मी तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करीत आहे. तूच माझे जग आहेस, हे या स्थानी मी तुला जाणवून देत आहे, अशा शब्दांमध्ये त्याने तिला आपल्या प्रेमाचा संदेश दिला होता. अशा प्रकारे एक नव्हे, दोन नव्हे, सात वर्षे पार पडली. पण त्याने आपला निर्धार सोडला नाही. मात्र, अखेर ती विरघळली. नुकताच त्यांचा विवाह झाला आहे.









