रक्षाबंधनाचा सण आपण साऱ्याजणांनी शनिवारी साजरा केला आहे. या दिवशी घराघरांमधून बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. बंधू आपल्या भगिनींना त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात. तथापि, बुंदेलखंड येथील महोबा आणि छत्तरपूर या जिल्ह्यांमध्ये हा सण साजरा करण्याची एक वेगळीच परंपरा आहे. येथे हा सण निश्चित दिवशी साजरा केला जात नाही. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. तसेच या दिवशी महोबा येथे ऐतिहासिक मेळ्याचे आयोजन केले जाते. तसेच या भूमीवर जन्मलेल्या वीरांच्या स्मरणार्थ शोभायात्रा होते.
रक्षाबंधन नेहमीच्या दिवसाच्या एक दिवस उशीरा साजरे करण्याची परंपरा या भागात इसवीसन 1182 पासून, अर्थात आठशे वर्षांपासून आहे. या परंपरेमागे बंधू भगिनींमधील प्रेम आणि एका इतिहासप्रसिद्ध युद्धाची पार्श्वभूमी आहे. त्यावेळी दिल्लीचा शासक पृथ्वीराज चौहान याने महोबावर आक्रमण केले होते. त्यावेळी महोबा क्षेत्र चंदेश शासकांच्या आधीन होते. पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीराज चौहान आणि चंदेल यांच्या सैन्यमध्ये घनघोर युद्ध झाले होते. हे युद्ध संपल्यानंतर सर्व सैनिक घरी परतले. तो रक्षाबंधनाच्या नंतरचा दुसरा दिवस होता. त्यामुळे या भागांमध्ये रक्षाबंधन सण नेहमीच्या दिवसानंतर एक दिवसाने साजरा करण्यात येतो. असे म्हणतात, की पृथ्वीराज चौहान याने युद्ध होऊ न देण्यासाठी पाच अटी घातल्या होता. तथापि, महोबाच्या राजाने त्या पाचही अटी धुडकावून लावल्या. त्यानंतर पृथ्वीराज चौहान याने सात लाखाच्या सेनेसह महोबावर आक्रमण केले. मात्र, महोबाच्या शूर सैनिकांनी आल्हा आणि उदल या वीरांच्या नेतृत्वात मोठा पराक्रम गाजवला आणि पृथ्वीराज चौहानाच्या मोठ्या सेनेचा पराभव केला. पौर्णिमेचा पूर्ण दिवस हे युद्ध चालले. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा करता आला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अशा प्रकारे राखी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे न करणारा हा भारतातील एकमेव भाग आहे, अशी माहिती येथील अनेक ज्येष्ठ नागरीकांकडून दिली जाते.









