ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टिका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करून “राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभलाय” असा आरोप त्यांनी केला. आज ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे ( Roshni Shinde) यांना जबर मारहाण केली. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे- फडणवीस सरारवर जोरदार टिका केली.
ठाकरे गटाच्या महीला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार मारहाण केली. जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह हॉस्पिटलला भेट देऊन रोशनी शिंदे यांची विचारपूस केली. त्यानंतर लगेच त्यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष केले.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आपल्या राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला, तरी त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “यांची गुंडगिरी वाढायला लागली असून ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली, त्यानंतर महिलांना मारहाण करण्यात आली. आज आम्ही जाऊन त्या महिलेला भेटलो. तेव्हा त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नसल्याचे सांगितले तसेच त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओदेखिल करून घेण्यात आला. त्यानंतर आणखी महिलांना बोलवून त्यांनी मारहाण केली. मला वाटतं अशा फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा कोणताच अधिकार नाही.” अशा परखड शब्दात माजी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र डागले.