रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर : पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने शेतकरी चिंताजनक स्थितीत
वार्ताहर /किणये
यंदा मान्सून काळात पाऊस झाला नाही. यामुळे खरीप हंगामातील भात व इतर पिके सुकून गेली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बळीराजाची सगळी आस रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. रब्बी हंगामातील बियाणांची पेरणी करण्यात आली असून पावसाअभावी जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना चक्क टँकरच्या पाण्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामातील बरीच पिके वाया गेली. पाऊस झाला नाही. यामुळे शेत शिवारात ओलावा झाला नाही. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील वाटाणा, मसूर, हरभरा व जोंधळा आदींची पेरणी केलेली आहे. मात्र जमिनीत ओलावा नसल्यामुळे पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवण होत नाही. याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे. नावगे परिसरातील बरेच शेतकरी सध्या पैसे देऊन टॅंकरने पाणी विकत घेऊन या पिकांना देत आहेत. काहीही करून रब्बीतील पिके जगविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. पाण्यासाठी बळीराजाला आता धडपड करावी लागत आहे.
दरवर्षी तालुक्यात रब्बी हंगामात जोंधळा, वाटाणा, हरभरा, मसूर आदी पिके बऱ्यापैकी घेण्यात येतात. यंदा जमिनीत ओलसरपणा नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील बियाण्याची पेरणी केली नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी रब्बीतील पेरणी केली आहे त्याची उगवण झालेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेलीच. मात्र रब्बी हंगाम शेतकऱ्यांना साधायचा कसा याची अधिक चिंता लागून राहिली आहे. नदी, नाल्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे जसजसा उन्हाळा वाढेल तसतसा पाण्याचा प्रश्न अधिक प्रमाणात निर्माण होणार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोठ्यात दोन-चार जनावरे आहेत. यावर्षी भातपीक चांगले आले नाही. यामुळे यंदा पिंजर अगदीच कमी प्रमाणात आहे. तालुक्यातील बरेच शेतकरी रब्बी हंगामात जोंधळ्याचे पीक अधिक प्रमाणात घेतात. जोंधळ्याची कणसे धरल्यानंतर जोंधळा जनावरांना सुका चारा म्हणून वापरला जातो. मात्र आता या सुक्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
पाऊस न झाल्याने टँकरने पाणी घेण्याची वेळ- विश्वनाथ सुतार, नावगे
शिवारात जोंधळा पेरलेला आहे. मात्र जमिनीत ओलावा नसल्यामुळे त्याची उगवण होत नाही. पावसाची वाट बघितली. जमिनीत ओलावा नाही. करायचे काय? याची चिंता आम्हाला अधिक होऊ लागली आहे. त्यामुळे आता टँकरने पाणी घेऊन या पिकाला देत आहे. एका टँकरला पाचशे रुपये इतका खर्च येत आहे. यंदा आमचे जगणे मुश्किल झाले आहे. खरीप हंगामात पाऊस झाला नाही. यामुळे भातपीक व्यवस्थित आले नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
विहिरी-कूपनलिकांची पाणीपातळीही घटली – रमेश सुरुतकर
शेतात जोंधळा, हरभरा, वाटाणा आदींची पेरणी केलेली आहे. त्याची उगवण झाली नाही. निसर्गाचे चक्र असे कसे काय बदलले हेच कळत नाही. बेळगाव तालुक्यात यंदा दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे आता पिकांना पैशाने पाणी देण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. पिकांना किती दिवस टॅंकरने पाणी द्यायचे हेच आम्हाला कळत नाही.









