बहुतेक वन्यप्राणी, मग ते शाकाहारी असोत, किंवा मांसाहारी, माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात असे प्राणीतज्ञांचे निरीक्षण आहे. केवळ जे प्राणी पाळीव आहेत, (कुत्रा, मांजर किंवा इतर काही प्राणी) ते तेवढे माणसाला धरुन असतात. इतर कोणत्याही चतुष्पाद प्राण्यापेक्षा माणसाची शैली भिन्न असते. त्यामुळे माणसापासून आपल्याला धोका आहे, असे सातत्याने वन्य प्राण्यांना वाटते आणि ते माणसापासून एकतर दूर पळतात किंवा ते शक्य नसेल तर माणसावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. असा या नैसर्गिक वैऱ्यांना काहीवेळा निसर्गच एकमेकांच्या जवळ आणतो. एकमेकांचे मित्रही बनवतो.

असाच प्रकार यंदाच्या पावसाने घडविला आहे. जपानमध्ये नारा या शहरात आणि त्याच्या आसपास असणाऱ्या वनमय प्रदेशात प्रचंड पाऊस होत आहे. अशीं वृष्टी कित्येक दशकांमध्ये झालेली नाही, असे बोलले जात आहे. या वृष्टीमुळे नाराच्या आसपासच्या वन्य प्रदेशातील वन्य हरिणे शहरात आली असून ती माणसांच्या सोबत रहात आहेत. सहसा हीं हरणे माणसांच्या दृष्टीस पडणेही कठीण असते. कारण या हरिणांचा वेग प्रचंड असतो आणि माणसाची जराशी चाहूल लागली तरीही ती घनदाट वनात पळून जातात. पण या वन्य सखल प्रदेशात प्रचंड पर्जन्यवृष्टी झाल्याने ती उंचावर असलेल्या शहर प्रदेशात आलेली आहेत. नारा शहरातील बसस्थानके, उद्याने आणि इतर सार्वजनिक स्थानांमध्ये त्यांनी ‘घुसखोरी’ केली असली तरी, शहरातील नागरीकांनी ती आनंदाने खपवून घेतली आहे. पाऊस ओसरला हे अतिथी परत आपल्या आधिवासात जाणारच आहेत, हे नागरीकांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी या न बोलाविलेल्या अतिथींची अडचण ओळखून त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली आहे. हरिणेही माणसांच्या सहवासात मजेत असल्याचे दिसत आहे. यालाच म्हणतात नैसर्गिक चमत्कार.









