पंजाब सीमेवर अमली पदार्थांची तीन पाकिटे जप्त
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ड्रोनला पाडण्यात आले आहे. या ड्रोनमध्ये एक बॅगही सापडली असून त्यामधून अमली पदार्थांची तीन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय एक लोखंडी रिंग आणि 4 चमकदार पट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत. अमृतसर जिह्यातील धानो कलान गावाजवळील गव्हाच्या शेतातून ही बॅग जप्त करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री 8.22 वाजता घडली. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना ड्रोन दिसताच त्यांनी लगेच गोळीबार सुरू केला. बॅगेतून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन सुमारे तीन किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अमली पदार्थ हेरॉईन असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अलीकडेच जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्येही सुरक्षा दलांनी एक मोठा कट उधळून लावत ड्रोन पाडले होते. हे ड्रोनही पाकिस्तानातून आले होते. घुसखोरीचा प्रयत्न करत असताना एका मोठ्या कारवाईत भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ एक ड्रोन पाडून दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. या ड्रोनमधून शस्त्रांसोबतच पैसेही जप्त करण्यात आले होते. तसेच 9 एप्रिल रोजी पूंछ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्नही हाणून पाडला होता. यादरम्यान एक घुसखोर ठार झाला होता. तर अन्य दोघांना अटक करण्यात आली होती.









