महिलांनी स्वीकारली जबाबदारी : बेळगावहून हैदराबादला 180 प्रवाशी क्षमता असणारी एअरबस
बेळगाव : इन्स्ट्रूमेंटल लँडिंग सिस्टीमची (आयएलएस) यशस्वीरित्या सोमवारी चाचणी घेण्यात आली. हैदराबादहून बेळगावमध्ये दाखल झालेले ए-320 हे विमान यशस्वीरित्या बेळगावमध्ये दाखल झाले. त्यामुळे पुढील काळात ढगाळ वातावरण व कमी दृष्यमानता असतानाही सांबरा विमानतळावर विमान उतरविणे सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर व वैमानिकदेखील महिलाच होत्या. इंडिगो कंपनीचे विमान सकाळी 8.30 वाजता हैदराबादहून निघून सकाळी 10 वाजता बेळगावला पोहोचले. बेळगावमध्ये 2019 पासून आयएलएस ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू होते. ढगाळ वातावरण अथवा कमी दृष्यमानता असतानाही विमान उतरविण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. बऱ्याचवेळा खराब हवामानामुळे विमान इतरत्र उतरावे लागते. ही समस्या आता यापुढे बेळगावमध्ये येणार नाही. बेळगावहून हैदराबादला एअरबस सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. 180 प्रवाशी क्षमता असणारी एअरबस 31 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. बेळगावहून दिल्लीला जाणारे प्रवासी हैदराबादमार्गे प्रवास करत असल्याने एअरबस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
बेळगावच्या तरुणीचा सहभाग
आयएलएस यंत्रणेची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण जबाबदारी महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. एअरपोर्टच्या ट्रॅफिक कंट्रोलर रिचा गोस्वामी यांची यावेळी महत्त्वाची मदत मिळाली. विशेष म्हणजे इंडिगोच्या विमानामध्ये असणाऱ्या महिलांमध्ये बेळगावच्या तरुणीचा सहभाग होता. कीर्ती अणवेकर हिचा या क्रू मेंबरमध्ये सहभाग होता. तिच्यासोबत कॅप्टन रंजना वेळू, आकांक्षा शर्मा, व्ट्रिंकल, थौडूम, श्रीमोइनती यांचाही सहभाग होता.