सैन्याच्या सामर्थ्यात होणार वाढ
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेयर
भारतीय वायुदलाने अंदमान आणि निकोबार बेटसमुहानजीक ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आवृत्तीचे यशस्वी परीक्षण केले आहे. या क्षेपणास्त्राने परीक्षणादरम्यान सर्व उद्देशांची प्राप्ती केली आहे. विस्तारित पल्ल्याचे हे नवे ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र 450 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. सैन्याच्या ब्राह्मोस मिसाइल रेजिमेंटने हे यशस्वी परीक्षण पिन पॉइंट अचूकतेसह केले आहे. याकरता एका अन्य बेटावर लक्ष्य ठेवण्यात आले होते, जे क्षेपणास्त्राने अचूकपणे भेदले आहे. याचबरोबर भारतीय सैन्याच्या नावावर आणखी एक कामगिरी नोंद झाली आहे. ब्राह्मोस क्रूज क्षेपणास्त्र जगातील सर्वात वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भारतीय सैन्याने याच्या लँड अटॅक आवृत्तीचे पहिले परीक्षण 24 नोव्हेंबर 2020 रोजी अंदमान आणि निकोबार बेटसमुहावरच केले होते.









