30 डिसेंबरला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
सिलिगुडी / वृत्तसंस्था
ईशान्य प्रंटियर रेल्वेच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी सोमवारी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. हावडा ते न्यू जलपाईगुडी स्थानकांदरम्यान ही चाचणी पूर्ण केली. ही रेल्वे लवकरच सुरू करण्यात येणार असून ईशान्येतील या पहिल्या ‘वंदे भारत’मुळे देशाला आणखी एका ‘एक्स्प्रेस’ची भेट मिळणार आहे. या एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदी 30 डिसेंबरला हिरवा झेंडा दाखवतील. सिलिगुडी ते कोलकातादरम्यान ही एक्स्प्रेस धावणार असून या रेल्वेमुळे दक्षिण आणि उत्तर बंगालमधील अंतर कमी वेळेत पार करता येणार आहे. देशातील सातव्या वंदे भारत रेल्वेला सोमवारी पहिल्या चाचणीवेळी 560 किमी अंतर कापण्यासाठी सुमारे 8.30 तास लागल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शुभेंदू चौधरी यांनी दिली. वंदे भारतमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि वाय-फाय यांसारख्या प्रवासी-अनुकूल सुविधा असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.









