लाहोरपासून चेन्नईपर्यंत करू शकते वार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या शाहीन-2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण यशस्वी ठरले आहे. पाक सैन्याची माध्यम शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सकडून मंगळवारी यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण पार पडले आहे. शाहीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचा उद्देश सैनिकांना प्रशिक्षण देणे, अचूकता आणि विविध सब-सिस्टीमच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे होते असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले.
शाहीन आण्विक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणावेळी पाक सैन्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रणनीतिक योजना प्रभागाच्या महासंचालकाने क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणाला ऐतिहासिक कामगिरी ठरविले आहे. या क्षेपणास्त्राला पाकिस्तानातच विकसित करण्यात आल्याचा दावा आहे. तर या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 2,200 किलोमीटरपर्यंत ते एक टन वजनाची पारंपरिक किंवा रणनीतिक शस्त्रास्त्रs वाहून नेण्यास सक्षम आहे.
भारताची चिंता वाढणार
पाकिस्तानी सैन्याचे हे क्षेपणास्त्र अॅडव्हान्स नेव्हिगेशन, पोस्ट-सेपरेशन एटीट्यूट करेक्शन आणि एबीएम काउंटरमेशर्स समवेत अत्याधुनिक उपप्रणालींनी युक्त आहे. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला भारतासाठी चिंतेचे कारण ठरू शकतो. हे क्षेपणास्त्र 2200 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. अशास्थितीत हे पाकिस्तानच्या लाहोरपासून दक्षिण भारतातील मोठे शहर चेन्नईपर्यंत हल्ला करण्यास सक्षम ठरणार आहे.









