पाण्यातील लक्ष्याचा केला भेद : अंडर वॉटर डोमेनमध्ये भारत अधिक मजबूत
► वृत्तसंस्था/ कोची
शत्रू समुद्रात लपलेला असला तरीही भारतीय नौदलाचे ‘वरुणास्त्र’ त्याला शोधून नष्ट करणार आहे. ‘वरुणास्त्र’देशात विकसित करण्यात आलेल्या हेवीवेट टॉरपीडोचे नाव आहे. नौदलाने मंगळवारी या टॉरपीडोद्वारे पाण्यातील लक्ष्याचा भेद करून दाखविले आहे. नौदलाने या परीक्षणाचा व्हिडिओ जारी केला आहे.
हे परीक्षण म्हणजेच मैलाचा दगड असल्याचे नौदलाकडून म्हटले गेले आहे. ‘वरुणास्त्र’ नौदलासाठी डीआरडीओच्या नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरट्रीने विकसित केले आहे. हा अत्याधुनिक अँटी-सबमरीन टॉरपीडो आहे. युद्धनौकेवरून डागता येणाऱ्या याच्या वर्जनला 2016 मध्ये नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते. 1500 किलो वजन आणि सुमारे 8 मीटर लांबीच्या ‘वरुणास्त्रा’चा मारक पल्ला कमाल 600 मीटर खोलीपर्यंत 40 नॉट्सच्या कमाल वेगासह लक्ष्याची शिकार करण्याचा आहे.
नौदलाने मंगळवारी वरुणास्त्राच्या सबमरीन वेरिएंटचे परीक्षण केले असून यात इलेक्ट्रिक प्रपल्शन सिस्टीम बसविण्यात आली आहे. हा टॉरपीडो स्वत:सोबत 250 किलोग्रॅमचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. या हेवीवेट टॉरपीडोचा सुमारे 95 टक्के हिस्सा स्वदेशी असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
वरुणास्त्रामध्ये कन्फर्मल एरे ट्रान्सड्यूसर लावण्यात आले असून ते याला उर्वरित टॉरपीडोच्या तुलनेत अधिक क्षमता प्रदान करतात. वरुणास्त्रात अॅडव्हान्स्ड ऑटोनॉमस गायडेन्स अल्गोरिमद आहे. याला युद्धनौका आणि पाणबुडी दोन्हींमधून डागता येणार आहे. वरुणास्त्र हा जीपीएस आधारित लोकेटिंग एड सिस्टीम असणारा जगातील एकमेव टॉरपीडो आहे.
भविष्यात तयार होणाऱ्या भारतीय नौदलाच्या सर्व पाणबुडीविरोधी युद्धनौकांमध्ये वरुणास्त्र डागण्याची क्षमता असणार आहे. सध्या या टॉरपीडोला विशाखापट्टणम क्लास आणि कमोरता क्लास, कोलकाता क्लास, राजपूत क्लासच्या डिस्ट्रॉयर्समध्ये तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर नीलगिरी आणि तलवार क्लासच्या फ्रिगेट्समध्येही या टॉरपीडोला सामील करण्यात आले आहे.









