सैन्याच्या ताफ्यात होणार सामील : शत्रूच्या रणगाड्यांना क्षणार्धात नष्ट करणार
वृत्तसंस्था/ पोखरण
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) स्वदेशी नाग क्षेपणास्त्र एमके2 चे यशस्वी परीक्षण केले आहे. हे परीक्षण पोखरण फील्ड रेंजमध्ये पार पडले आहे. नाग एमके2 एक तिसऱ्या पिढीचे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. हे ‘फायर-अँड-फॉरगेट’ तंत्रज्ञानावर काम करते.
तिन्ही परीक्षणांदरम्यान क्षेपणास्त्र प्रणालींनी कमाल आणि किमान मर्यादेच्या सर्व लक्ष्यांना अचूकपणे नष्ट केले आहे, यामुळे याची लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेची पुष्टी झाली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. नाग मिसाइल कॅरियन-2 चेही परीक्षण करण्यात आले आहे. याचबरोबर पूर्ण शस्त्रास्त्र प्रणाली आता भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी तयार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्य आणि उद्योगजगताचे अभिनंदन केले आहे.
नाग क्षेपणास्त्र डीआरडीओने 300 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकसित केले आहे. याचे पहिले यशस्वी परीक्षण 1990 मध्ये करण्यात आले होते. जुलै 2019 मध्ये पोखरण फायरिंग रेंजमध्ये याचे परीक्षण करण्यात आले होते. याचबरोबर 2017, 2018 आणि 2019 मध्ये वेगवेगळी परीक्षणं करण्यात आली, ज्यात प्रत्येकवेळेला नवे तंत्रज्ञान जोडण्यात आले. हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या एकीकृत निर्देशित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा हिस्सा आहे. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूच्या रणगाड्यांच्या विरोधात भारताची शक्ती अनेक पटीने वाढविणार आहे. तसेच सैन्याला आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त करणार आहे.
हे क्षेपणास्त्र 230 मीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने स्वत:च्या लक्ष्यावर प्रहार करते. म्हणजेच 4 किलोमीटर अंतरावरील शत्रूला 17-18 सेकंदात नष्ट करू शकते. नागा एमके-2 भारतीय सैन्यासाठी अत्याधुनिक रणगाडाभेदी गायडेड मिसाइल सिस्टीम आहे. ही यंत्रणा सर्व ऋतूंमध्ये काम करण्यास सक्षम आहे. याचे वजन सुमारे 45 किलो असून ते 6 फूट एक इंच लांबीचे आहे. याचा मारक पल्ला 4 किलोमीटरपर्यंत आहे.









