पाकिस्तानसोबतच्या संघर्षानंतर स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला गती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चांदीपूर
अलिकडच्या वर्षांत भारताने आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परंतु ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर संरक्षण क्षेत्राला अधिकच सुसज्ज करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे. भारताने गुरुवारी स्वदेशी विकसित केलेल्या पृथ्वी-2 आणि अग्नि-1 या दोन शक्तिशाली लघु-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. त्यापूर्वी बुधवारी भारताने लडाखमध्ये आकाश हवाई संरक्षण प्रणालीची प्रगत आवृत्ती आकाश प्राईमची यशस्वी चाचणी केली होती.
16-17 जुलै 2025 रोजी भारताने 24 तासांच्या आत आकाश-प्राईम, पृथ्वी-2 आणि अग्नि-1 या तीन स्वदेशी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. यासोबतच एके-203 असॉल्ट रायफल सैन्यात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेने नि:संशयपणे प्रत्येक भारतीयाचे मनोबल वाढवले आहे. तसेच भारत सरकारने फ्रान्सला भारतात स्टेल्थ फायटर जेट तयार करण्यास राजी केल्याची बातमीही येत आहे. सुमारे 61,000 कोटी रुपयांच्या संरक्षण करारानंतर, पाचव्या पिढीतील अत्याधुनिक स्वदेशी स्टील्थ लढाऊ विमाने भारतात बनवता येतील असे म्हटले जात आहे. अर्थात, भारताला केवळ पाकिस्तानशीच नव्हे तर चीनशीही स्पर्धा करता यावी यासाठी हे यश खूप महत्त्वाचे मानले जात आहे. या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आपल्या महत्त्वाच्या गरजांनुसार स्वत:ला आत्मनिर्भर बनवत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ओडिशाच्या चांदीपूर येथे पृथ्वी-2 आणि अग्नि-1 या लघु-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक पॅरामीटर्सची पुष्टी करण्यात आली. या चाचण्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या. या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे चाचणी प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले आहे. दोन्ही क्षेपणास्त्रs देशाची धोरणात्मक क्षमता मजबूत करतात आणि किमान प्रतिबंध धोरणांतर्गत भारताच्या सुरक्षा संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.









