बेळगाव : जिल्हा रुग्णालयामध्ये 50 वर्षीय महिलेवर शस्त्रचिकित्सा करून पोटातील 6.5 किलो वजनाची गाठ काढण्यात बिम्सच्या डॉक्टरांना यश आले. अत्यंत अवघड असलेली शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्या 50 वर्षीय महिलेला शस्त्रचिकित्सेसाठी दाखल करण्यात आले होते. सदर महिलेला तत्पूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पैशांच्या विवंचनेमुळे तिला बिम्समध्ये पाठविण्यात आले होते. बिम्समधील शस्त्रचिकित्सा विभागात दाखल झाल्यानंतर डाव्या मूत्रपिंडामध्ये गाठ असल्याचे निदान झाले होते.
शस्त्रचिकित्सेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाला होता. तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून मूत्रपिंड शस्त्रचिकित्सक डॉ. महांतेश तोडकर, डॉ. संदीप रेड्डी, भूलतज्ञ डॉ. प्रशांत आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चार तास शस्त्रचिकित्सा करून रुग्णाच्या डाव्या मूत्रपिंडातील 6.5 किलो वजनाची गाठ काढण्यात यश आले आहे. या माध्यमातून महिलेला जीवदान देण्यात आले आहे. आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत सदर महिलेला उपचार देऊन सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. यशस्वीरीत्या शस्त्रचिकित्सा केलेल्या वैद्यकीय पथकाचे बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरण्णा पल्लेद,जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे, वैद्याधिकारी डॉ. सरोज तिगडी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.









