वृत्तसंस्था/म्युनिच (जर्मनी)
भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला स्पोर्ट्स हार्नियाची बाधा झाली होती आणि काही दिवसांपासून त्याला या व्याधीच्या वेदना जाणवत होत्या. म्युनिचमध्ये एका खासगी रुग्णालयात सूर्यकुमार यादववर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. 34 वर्षीय सूर्यकुमारला उदराच्या उजव्या बाजुला वेदना होत होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला हार्नियाची बाधा झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी लागलीच त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. लवकरच सूर्यकुमार मायदेशी दाखल होणार असून काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तो बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये दाखल होणार आहे. सुमारे दोन आठवडे त्याला या व्याधीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी लागतील. आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा ऑगस्ट महिन्यात आयोजित केला असून या दौऱ्यात सूर्यकुमार पूर्णपणे तंदुरुस्त राहिल, असे सांगण्यात आले. बांगलादेशच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. सूर्यकुमार यादववर अलिकडच्या काही कालावधींमध्ये तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 2023 साली पहिल्यांदा घोट्यावर तर 2024 साली दुसऱ्यांदा हार्नियावर शस्त्रक्रिया झाली होती.









