इस्रोच्या अभियानाचा प्रथम टप्पा पार, 40 दिवसांनंतर चंद्रावर होणार अवतरण
वृत्तसंस्था / श्रीहरीकोटा
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) बहुचर्चित चांद्रयान-3 अभियानाचा प्रथम टप्पा यशस्वी रितीने पार पडला आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयानासह इस्रोच्या एलव्हीएम 3-एम 4 या चांद्र वाहनाने अवकाशात पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार झेप घेतली. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा या केंद्रावरुन हे प्रक्षेपण करण्यात आले. या यानाचे 40 दिवसांनी, अर्थात 23 ऑगस्ट या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साधारणत: पाच वाजता चंद्रावर अवतरण होणार आहे. या पहिल्या भागाच्या पूर्ततेसंबंधी संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ आणि या प्रकल्पाचे संचालक पी. वीरमुथुवेल यांनी समाधान व्यक्त केले.
चंद्रावर यान उतरविण्याचा हा इस्रोचा दुसरा प्रयत्न आहे. पहिला प्रयत्न 2019 मध्ये करण्यात आला होता. मात्र, तेव्हा तो अंतिम टप्प्यात यानाशी संपर्क तुटल्याने अयशस्वी झाला होता. त्या अनुभवावरुन संस्थेने या वेळी प्रकियेत योग्य त्या सुधारणा केल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. चांद्रयान-3 या प्रकल्पाला साधारणत: 600 कोटी रुपये खर्च येणार आहे. चंद्रावर यान उतरविण्याचे ध्येय आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी पूर्ण केले आहे. भारताचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास तो तिसरा देश होणार आहे.

‘फॅट बॉय’चे ‘विक्रम’सह प्रक्षेपण
एलव्हीएम-3 एम-4 हे चांद्र वाहन ‘फॅट बॉय’ या सांकेतिक नावाने ओळखले जात आहे. हा अग्निबाण असून त्यावरुन चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. हे चांद्रयान किंवा लँडर ‘विक्रम’ या नावाचे असून हे नाव भारताचे थोर दिवंगत अवकाश संशोधक विक्रम साराभाई यांच्यावरुन ठेवण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी या अग्निबाणाने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्राच्या द्वितीय क्रमांकाच्या प्रक्षेपण स्थानावरुन अवकाशात उ•ाण केले. या उ•ाणाचे निरीक्षण करण्यासाठी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ, या प्रकल्पाचे संचालक पी. वीरमुथुवेल, इतर महत्वाचे पदाधिकारी आणि संशोधक, या प्रकल्पाचे संशोधक आणि कर्मचारी, केंद्रीय मंत्री जीतेंद्रसिंग तसेच सहस्रावधी सर्वसामान्य नागरीकही उपस्थित होते. यानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर या साऱ्या उपस्थितांनी हर्षोल्हासात आनंद व्यक्त केला. यानाचा यापुढचा प्रवासही सुखरुप होईल आणि विक्रमचे चंद्रावर यशस्वीरित्या अवतरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रथमच सर्वसामान्यांना संधी
इस्रोचे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्याची संधी यावेळी सर्वसामान्य नागरिकांनाही प्रथमच देण्यात आली होती. प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरीकांकडून प्रथम आवेदनपत्र स्वीकारण्यात आले होते. या उपक्रमाला नागरीकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळेच प्रक्षेपणाच्या स्थानी यावेळी सहस्रावधी नागरीकांचीही उपस्थिती होती. दाट धुराचा जाड लोट सोडून ज्यावेळी यानाने अवकाशात झेप घेतली त्यावेळी साऱ्या उपस्थितांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाल्याचे समाधान लाभले. अनेकांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या.
वातावरण अनुकूल, यान कक्षेत
यानाच्या प्रक्षेपणाच्या वेळी आकाश निरभ्र होते आणि वातावरण प्रक्षेपणाला अनुकूल असे होते. त्यामुळे पूर्वनिर्धारित समयी प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर काही वेळातच अग्निबाणाने या यानाला त्याच्या पूर्वनिर्धारित कक्षेत स्थापित केले. प्रक्षेपणानंतर 16 मिनिटांनी यान अग्निबाणापासून वेगळे झाले आणि त्याने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यास प्रारंभ केला. हे यान पृथ्वीभोवती अंडाकृती मार्गाने पाच ते सहा वेळा प्रदक्षिण घालणार आहे. यावेळी त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे न्यूनतम अंतर 170 किलोमीटर तर अधिकतम अंतर 36,500 किलोमीटर इतके राहणार आहे. ही माहिती संस्थेकडून प्रसारित करण्यात आली आहे.

चांद्रयानास शुभेच्छा
चांद्रयान आता अग्निबाणापासून स्वतंत्र झाले आहे. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास त्याला त्याच्या अंतर्गत बसविण्यात आलेल्या यंत्रणेच्या आधारावर करावा लागणार आहे. या प्रवासासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देत आहोत, असा संदेश इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिला. यानाच्या पुढच्या प्रवासावर संस्थेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाणार असून त्याच्या प्रवासावर आणि चंद्रावर होणाऱ्या त्याच्या अवतरणावर नियंत्रणही ठेवले जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
खरे आव्हान यापुढेच
या चांद्रयान प्रकल्पासमोरचे खरे आव्हान यापुढेच आहे. आता पृथ्वीभोवती पाच ते सहा प्रदक्षिणा करुन नंतर त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर वाढणार आहे. याचाच अर्थ असा की त्याची पृथ्वीभोवतीची कक्षा अधिक रुंदावणार आहे. पुढच्या टप्प्यात यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असून नंतर चंद्राच्या अगदी जवळ जाऊन विक्रम लँडर चंद्रावर सोडणार आहे. या सर्व प्रक्रियेला साधारणत: चाळीस दिवस लागणार आहेत. सर्वात महत्वाचा भाग चंद्राच्या जवळ जाऊन विक्रमचे अवतरण करणे हा आहे. विक्रम हे वाहन त्यानंतर चंद्राचा अभ्यास करुन छायाचित्रे पाठवणार आहे. विक्रमचे कार्य वर्षभर चालण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती देण्यात आली.

अग्निबाणाची विश्वासार्हता वादातीत
एलव्हीएम या स्वदेशनिर्मित अग्निबाणाची विश्वासार्हता या प्रक्षेपणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आतापर्यंत अनेक प्रक्षेपणे त्याने यशस्वी केलेली आहेत. या अग्निबाणाच्या यशाचे प्रमाण जगातील अन्य देशांपेक्षाही अधिक असल्याचे दिसून येत आहे. शिवाय भारताचा प्रक्षेपणाचा व्यय (खर्च) इतर देशांपेक्षा कितीतरी प्रमाणात कमी आहे. त्यामुळे आता इतर अनेक देश त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्याचे काम इस्रोला देत आहेत. त्यामुळे भविष्यकाळात भारताला हा मोठा व्यवसाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यानातील यंत्रणेचे निर्णय महत्वाचे
विक्रम या वाहनाला घेऊन जाणाऱ्या यानात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित नियंत्रक उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान चंद्राच्या जवळ पोहचून विक्रमचे अवतरण करताना काही अडचण निर्माण झाली, तर यानातील यंत्रणेला स्वबळावर तातडीचे निर्णय घेऊन अडचणी त्वरित सोडवाव्या लागतात. हे कार्य जितक्या लवकर होईल तितके विक्रमचे अवतरण सुरळीत होणार आहे. हे सर्व कार्य अक्षरश: काही मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागते. हेच खरे आव्हान आहे. अर्थात, तशी कठीण परिस्थिती उद्भवलीच नाही, तर अवतरण सुरळीत होईल हे निश्चित आहे. अलिकडच्या काळात जपान आणि इस्रायल त्याची अनुक्रमे हाकूटो आणि बेरेशीट नामक वाहने चंद्रावर उतरविण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी ठरला होता. ही बाब लक्षात घ्यावी लागते. म्हणून अपेक्षा बाळगताना सर्वसामान्यांनी, हे अभियान अतिशय कठीण आहे, याची जाणीव ठेवावी. संशोधक त्यांच्याकडून होतील तितके प्रयत्न करतातच, असे प्रतिपादन तज्ञांनी केले आहे.
जुलैचीच निवड कशासाठी ?
चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 या दोन्ही चांद्रअभियानांसाठी जुलै महिन्याचीच निवड करण्यात आली होती. कारण, या कालावधीत पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर वर्षभरातील सर्वात कमी असते. त्यामुळे अभियान लवकर पूर्ण करणे शक्य होते. तसेच ते यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जुलै महिन्याचीच निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.
इतिहास घडण्याची शक्यता
ड यानाचा यापुढचा प्रवास सुखरुप झाल्यास इतिहास घडण्याची शक्यता
ड चांद्रअभियानामुळे भारताची अवकाशसंशोधनाची क्षमता पुन्हा दिसणार
ड भविष्यकाळात अवकाश प्रक्षेपण व्यवसायात भारताला मोठी संधी शक्य
ड भारताचे अवकाश प्रक्षेपण अन्य देशांच्या तुलनेत स्वस्त पण गुणवत्तेचे









