प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे नफा : बेळगावकर आघाडीवर
बेळगाव : बेळगावच्या प्रवाशांनी रेल्वेच्या वेगवान प्रवासाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रतिसाद हा बेळगावमधून मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर-2024 या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत वंदे भारतमधून 42 हजार 219 प्रवाशांनी रेल्वे प्रवास केला आहे. बेळगावमधून बेंगळूर शहराला वंदे भारतची मागणी होत होती. याच दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-हुबळी व पुणे-कोल्हापूर अशा दोन वंदे भारत 17 ऑक्टोबरपासून सुरू केल्या. पहिल्यांदाच बेळगावच्या प्रवाशांना वेगवान प्रवास करत अवघ्या साडेसहा तासात पुण्याला पोहोचता येत असल्याने उत्तम प्रतिसाद मिळत गेला. तिकीट दर अधिक असला तरी प्रवाशांचा प्रतिसाद मात्र उत्तम आहे.
बेळगावहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांपेक्षा पुण्याहून बेळगावला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. चार महिन्यांच्या कालावधीत 18 हजार 300 प्रवासी हुबळीहून पुण्याला गेले. तर 23 हजार 850 प्रवासी पुणेहून हुबळीला आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रत्येक महिन्याला अंदाजे 13 फेऱ्या होत आहेत. बेळगावमधून आठवड्याचे तीन दिवस सेवा उपलब्ध आहे. सध्या या रेल्वेला 90 ते 95 टक्के बुकिंग होत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे. चार महिन्यांच्या कालावधीत रेल्वेला 4 कोटी 32 लाख रुपयांचा महसूल उपलब्ध झाला असल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.
बेळगावहून पुण्याला जाण्यासाठी रविवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सेवा उपलब्ध आहे. तर पुण्याहून बेळगावला सोमवार, गुरुवार व शनिवार अशा सेवा दिल्या जातात. दुपारी 2.15 वाजता पुणे रेल्वेस्थानकातून निघालेली वंदे भारत सातारा, सांगली, मिरज, घटप्रभा असे थांबे घेत बेळगावला रात्री 8.20 वाजता तर हुबळी येथे 10.45 वाजता पोहोचते. पहाटे 5 वाजता हुबळी येथून निघालेली वंदे भारत सकाळी 7 वाजता बेळगाव तर दुपारी 1.30 वाजता पुणे येथे पोहोचते.
वंदे भारतचे दरपत्रक
- बेळगाव-पुणे जेवणासह…………1295 रु.
- जेवणव्यतिरिक्त ………………… 955 रु.
- एक्सक्लुसिव्ह कोच जेवणासह…2290 रु.
- जेवणव्यतिरिक्त ……………………1890 रु.









