मालवण / प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील गौंजेचीयेथे श्री. प्रकाश मिस्त्री यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी गव्याची वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे सावंतवाडी वन विभागाला गौंजेचीवाडी येथे विहिरीमध्ये वन्यप्राणी गवा पडला असलेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार , सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर आणि कडावळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके यांच्या नेतृत्वाखाली जलद बचाव पथक वन्यप्राणी गवा सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता सदर वन्यप्राणी गवा पूर्णवाढ झालेला अंदाजे 15-16 वर्षे वयाचा नर गवा असल्याचे निदर्शनास आले. सदर गवा व्हायरवर वाढलेल्या वेलीचा अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडला असावा असे अंदाजावरून दिसून आले. गवा विहिरीत चिखलात रुतून राहिला होता. सदर गवा सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जेसीबीच्या सहाय्याने रॅम्प तयार करून रेस्क्यू व्हॅनमध्ये जाण्याकरता मार्ग मोकळा करून दिला. अश्या प्रकारे अथक प्रयत्नानंतर कोल्हापूर वनपरिक्षेत्राची रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने सहयाद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथील विशेष तयार करण्यात आलेल्या रेस्क्यू व्हॅन मध्ये घेऊन यशस्वीरित्या त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.
वन्यप्राणी गवा हा आपल्या जैवविविधतेतील एक मोठा तृणभक्षी प्राणी असून तो आपल्या जीवसृष्टीतील एक महत्वाचा घटक आहे, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्व सिधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात येत आहे.
ही बचाव मोहिम उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी व साहाय्यक वनसंरक्षक श्री. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वन परिमंडळचे वनपाल श्रीकृष्ण परीट , वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील ,वनरक्षक अमोल पटेकर , अनिकेत माने, महेंद्र देशमुख , दिनेश मेश्राम ,सरदार मनेर , वैदकीय अधिकारी श्री .वेरलेकर वनसेवक परब, इब्रह्मापुरकर तसेच गौंजवाडी गावचे सर्व पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ बांधव यांचे मोलाचे सहकार्याने पार पाडण्यात आली.