उद्या अवतरणार शिवशाही : पारंपरिक वेशात शिवभक्त सहभागी होणार
बेळगाव : राजहंसगडावर रविवार दि. 19 रोजी शिवमूर्तीला दुग्धाभिषेक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाभिमानी मराठी भाषिकांच्या सहकार्यातून हा सोहळा होणार आहे. राजहंसगड येथे शिवशाहीप्रमाणे सोहळा पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. म. ए. समितीचे कार्यकर्ते रात्रंदिवस या सोहळ्याच्या आयोजनासाठी राबत आहेत. राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या शिवमूर्तीचे दोनवेळा अनावरण करण्यात आले. केवळ मराठी भाषिकांची मते मिळविण्यासाठीचा हा एक केविलवाणा प्रयत्न होता. स्वाभिमानी मराठी भाषिकांना हे पटले नसल्याने रविवार दि. 19 रोजी शिवमूर्तीला दुग्धाभिषेक केला जाणार आहे. त्यापूर्वी राजहंसगडाच्या पायथ्यापासून शोभायात्रा काढली जाणार असून त्यामध्ये पारंपरिक वेशात हजारो शिवभक्त सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. केवळ बेळगावच नाही तर खानापूर व आसपासच्या भागातूनही शिवभक्त सहभागी होणार आहेत. दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी बेळगाव शहरासह तालुक्यात बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक गावातून शिवभक्त सहभागी होतील यासाठीची व्यवस्था केली जात आहे. राजहंसगडावर आकर्षक सजावट केली जाणार असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
महाप्रसादासाठी साहित्य, रक्कम जमा
महाप्रसादासाठी सर्वसामान्य शिवभक्तांकडून साहित्य व रक्कम स्वयंस्फूर्तीने जमा केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून बेळगावमधील व्यापारी, उद्योजक, माजी नगरसेवक यांनी आपल्याला शक्य तितके साहित्य व रक्कम म. ए. समितीकडे जमा केली आहे.









