6 रोजी मडगावातील शाळांना सुट्टी : मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. 6 रोजी मडगाव कदंब बसस्थानकावर विकसित भारत रॅलीचा शुभारंभ करण्याबरोबर भव्य सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, 6 रोजी मडगाव परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, वाहतुकीला अडथळा येऊ नये या दृष्टीकोनातून मडगाव परिसरातील सर्व शाळांना शिक्षण संचालनालयाने सुट्टी जाहीर केली आहे. मडगाव कदंब बस्थानकावर भव्य शामियाना घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. मडगाव कदंब बसस्थानक तसेच स्थानकाबाहेरील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे कामही शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. त्याचबरोबर कदंब बसस्थानकावरील जुन्या शेडचे सिमेंटचे पत्रे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या शेडवर आता नवीन पत्रे घातले जाणार आहेत. पंतप्रधानाची सभा कदंब बसस्थानकावर होत असल्याने कदंब बसस्थानकाला नवा साज चढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पुढील तीन-चार दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बसस्थानक तात्पुरता स्थलांतरित
मडगाव कदंब बसस्थानक आठ दिवसांसाठी तात्पुरता फातोर्डा येथील स्विमिंग पुलजवळील मैदानावर स्थलांतरित करण्यात आला आहे. या ठिकाणी तात्पुरती शेड उभारण्यात आली असून कदंब बसगाड्याच्या तिकिट आरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुचाकी पार्क करण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. कदंब बसस्थानक तात्पुरता स्थलांतरित करण्यात आल्याने लोकांची बरीच गैरसोय होऊ लागली आहे. मडगाव बाजारात येणाऱ्या लोकांना आपल्या गावाकडे जाणाऱ्या बसगाड्या पकडण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. त्यात पर्यटकांची देखील गैरसोय होताना आढळून येत आहे. कदंब बसस्थानकाच्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयातील सुरक्षा यंत्रणेने कदंब बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनाचे पालन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुऊवारी सायंकाळी कदंब बसस्थानकाची पाहणी करून एकूण कामाचा आढावा घेतला. सभेच्यापूर्वी सर्व गोष्टी सुरळीत होणार व ही सभा भव्य स्वरूपात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कदंब बस्थानकाची पाहणी करताना कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर उपस्थित होते.
6 रोजी मडगावातील शाळांना सुट्टी
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी 6 रोजी मडगाव परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. मडगावच्या जाहीर सभेला सुमारे 50 हजार लोकांची उपस्थिती लाभावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोव्यातील भाजपचे सर्व आमदार-मंत्री तसेच मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस यांची बैठक घेऊन किती लोकांची उपस्थिती लाभू शकते याचा आढावा घेतला. सभेला उपस्थित राहणाऱ्यांसाठी बसगाड्यांची व्यवस्थाही केली जाणार आहे. या सभेतून भाजप शक्तिप्रदर्शन घडविणार असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देखील फोडणार आहे.