आजपासून उत्सवाला सुरुवात
माशेल : माशेल येथील प्रसिद्ध चिखलकाला राज्य उत्सव म्हणून पर्यटन खात्यातर्फे जाहीर करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर 28 ते 30 जून असे तीन दिवस चिखलकाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. द्वादशीच्या दिवशी येथील देवकीकृष्ण मैदानावर चिखलकाला साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त मैदानावर भव्य मंडप उभारण्याचे काम सुरु झाले असून एकंदरीत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवार 28 रोजी रात्री 8 वा. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच खाद्य पदार्थांच्या स्टॉल्ससाठी जागा नियोजित करण्यात आली आहे. चिखलकाला खेळण्याच्या जागी सभोवताली बॅरिकेटस घालण्यात आले असून देवकीकृष्ण मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. गुरुवार 29 रोजी एकादशीच्या दिवशी दुपारी 11.45 वा. स्थानिकांतर्फे चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहांतर्गत रात्री प्रसिद्ध गायक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार 30 रोजी दुपारी 11.45 वा. चिखलकाल्याला सुरुवात होईल. यंदा हा उत्सव राज्य पातळीवर होणार असल्याने उत्सवाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी तसेच देशविदेशातील पर्यटकांनाही जाहिरातीच्या माध्यमातून या उत्सवाकडे आकर्षित करण्यात आले आहे. एकूणच चिखलकाल्याचे आयोजनाचे पर्यटन खात्यातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.









