प्रतिनिधी/ फोंडा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रविवार 16 रोजी सायं. 5 वा. फर्मागुडी येथे जाहीर सभा होत असून प्रदेश भाजपतर्फे त्यांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने गोव्यासंबंधी ते काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
शहा यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून सुरक्षेच्यादृष्टीनेही कडेकोट बंदोबस्त असेल. सायं. 4 वा. खास विमानाने ते दाबोळी विनातळावर उतरतील व त्यांचा ताफा थेट फर्मागुडी येथे दाखल होणार आहे. जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी फर्मागुडी येथील फार्मसी महाविद्यालयात प्रदेश भाजपच्या दक्षिण गोवा कोअर कमिटीच्या बैठकीला ते मार्गदर्शन करतील. या बैठकीला दक्षिण गोव्यातील आमदार, मंत्री तसेच कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित असतील. बैठक आटोपून सायं. 5 वा. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी मैदावरील जाहीर सभेला ते उपस्थिती लावतील. सभेला संबोधित करताना अमित शहा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. गोव्यात सध्या गाजत असलेल्या म्हादईच्या मुद्द्यावर ते आपली भूमिका स्पष्ट करतील की, या विषयाला बगल देतील याबाबतही भाजपाबरोबरच अन्य राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. सुमारे पंचवीस हजार जनसमुदाय या सभेला उपस्थित राहणार असल्याची घोषणा प्रदेश भाजपतर्फे करण्यात आली आहे.









