‘पीएसएलव्ही-सी56’ रॉकेटची दमदार कामगिरी
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून रविवारी सकाळी 6.30 वाजता सिंगापूरच्या सात उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण 44.4 मीटर लांबीच्या पीएसएलव्ही-सी56 रॉकेटद्वारे करण्यात आले आहे. लिफ्ट ऑफ केल्यानंतर 23 मिनिटांनी प्राथमिक उपग्रह विभक्त झाले. त्यानंतर उर्वरित 6 उपग्रह देखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या निर्धारित कक्षेत पोहोचल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. मुख्य उपग्रहासोबतच अन्य 6 सह-उपग्रहही अवकाशात स्थिरावले असून ते मायक्रो किंवा नॅनो स्वरुपाचे आहेत. त्यांची नावे व्हेलोक्स-एएम, आर्केड, स्कूब-2, नूलायन, गॅलास्सिया-2 आणि ओआरबी-12 स्ट्रायडर अशी आहेत. आता हे उपग्रह सिंगापूरमधील ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत.
सिंगापूरच्या उपग्रहांसाठी ‘पीएसएलव्ही’ने रविवारी 58 वे यशस्वी उड्डाण केले. अवकाशात पाठविण्यात आलेल्या सात उपग्रहांमध्ये डीएस-एसएआर हा 360 किलो वजनाचा सर्वात महत्त्वाचा उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डीएसटीए) आणि सिंगापूरच्या एसटी अभियांत्रिकी यांच्यातील भागिदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. सिंगापूर सरकारच्या विविध एजन्सींच्या उपग्रह प्रतिमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल. ‘डीएस-एसएआर’मध्ये इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजद्वारे (आयएआय) विकसित सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) पेलोड आहे. एसटी इंजिनियरिंग या उपग्रहाचा वापर अनेक प्रकारची छायाचित्रे काढण्यास करणार आहे. या उपग्रहाकडून कोणत्याही ऋतूमध्ये दिवसा किंवा रात्रीही छायाचित्रे काढली जातील.









