घनदाट जंगल व अंधारातही दृश्ये टिपण्याची क्षमता : इस्रो-नासाच्या संयुक्त मोहिमेकडून जगाला अनेक अपेक्षा
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत भारताने अंतराळाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. पृथ्वीचे अवलोकन करणारा उपग्रह ‘नासा-इस्रो सिंथटिक अपर्चर रडार’ म्हणजेच ‘निसार’ला जीएसएलव्ही-एस-16 रॉकेटद्वारे बुधवार, 30 जुलै रोजी अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. निसार हा जगातील पहिला रडार उपग्रह असून तो अवकाशातून पृथ्वीचे नियोजनबद्ध पद्धतीने नकाशे तयार करणार आहे. या मोहिमेचा कालावधी 5 वर्षे आहे. हा उपग्रह भारत, अमेरिकेसह पूर्ण जगासाठी उपयुक्त ठरणार आहे.
आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणून ‘निसार’ची ओळख आहे. या मोहिमेवर 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘निसार’ची निर्मिती इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे केली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:40 वाजता निसार अवकाशात झेपावल्यानंतर त्याला 747 किमी उंचीवर सूर्याशी समकालिक कक्षेत ठेवले. त्याला सुमारे 18 मिनिटे लागली. आता निसार 747 किमी उंचीवर ध्रुवीय कक्षेत फिरेल.
‘निसार’चे वजन 2,392 किलोग्रॅम असून हा उपग्रह पृथ्वीचे अवलोकन करणार आहे. दुहेरी आवृत्ती सिंथेटिक अपर्चर रडार (नासाचा एल-बॅड आणि इस्रोचा एस-बॅड)सोबत पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा पहिला उपग्रह असल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. हा उपग्रह स्वीप एसएआर तंत्रज्ञानाचा वापर करत 242 किलोमीटरची कक्षा आणि उच्च स्थानिक विभेदन क्षमतेसह पृथ्वीचे निरीक्षण करणार असून हे पहिल्यांदाच घडणार आहे. कुठल्याही उपग्रहीय छायचित्राच्या संबंधात उच्च स्थानिक विभेदन क्षमतेचा वापर होतो, ज्यात छायाचित्रात सूक्ष्म तपशीलही स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो.
‘निसार’ची महती… पूर्ण जगासाठी उपयुक्त
► हा उपग्रह कुठल्याही हवामानात आणि दिवसरात्र पृथ्वीची छायाचित्रे मिळवू शकतो. भूस्खलनाचे पूर्वाअनुमान, आपत्ती व्यवस्थापनात मदत करणे आणि हवामान बदलावर नजर ठेवण्यासही हा उगप्रह सक्षम आहे. पृथ्वीच्या नैसर्गिक संपदेच्या देखरेखीसाठी हा उपग्रह जगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
► हा उपग्रह 97 मिनिटात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. 12 दिवसांत 1,173 प्रदक्षिणा घालून ते पृथ्वीच्या विविध भागांचे नकाशे तयार करेल. ढग, घनदाट जंगले, धुरातून आणि अंधारातही पाहण्याची क्षमता त्याच्यात आहे. ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी लहान बदल देखील टिपू शकतो.
► निसार मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाचे बारकाईने निरीक्षण करणे हे आहे. या माध्यमातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा हिमनद्यांमध्ये होणारे बदल टिपले जातील. तसेच हा उपग्रह समुद्राच्या लाटा, त्यांचे बदल आणि सागरी वातावरण ट्रॅक करून अध्ययनासाठी माहिती उपलब्ध करेल.









