उत्तरप्रदेशविरुद्ध रणजी उपांत्य फेरी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या उपांत्य सामन्यात यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकाने मुंबईचा डाव सावरला. उत्तरप्रदेशविरूद्ध खेळताना मुंबईने दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 260 धावा जमविल्या. जैस्वालने शतक (100) झळकविले.
उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईच्या पहिल्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकांतील तिसऱया चेंडूवर उत्तरप्रदेशच्या यश दयालने कर्णधार पृथ्वी शॉला खाते उघडण्यापूर्वी गर्गकरवी झेलबाद केले. अमन जाफर मावीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने एक चौकारांसह 10 धावा जमविल्या. यश दयालने मुंबईला आणखी एक धक्का देताना सुवेद पारकरला सौरभकुमारकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 98 चेंडूत 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. मुंबईची स्थिती यावेळी 3 बाद 87 अशी केविलवाणी होती.
जैस्वालने आणि सर्फराज खान यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गडय़ासाटी 83 धावांची भागिदारी केली. करण शर्माने सर्फराज खानला झेलबाद केले. त्याने 52 चेंडूत 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. जैस्वाल आणि हार्दिक तेमोरे यांनी पाचव्या गडय़ासाठी 63 धावांची भर घातली. जैस्वालने 227 चेंडूत 15 चौकारांसह 100 धावा जमविल्या. शतक पूर्ण झाल्यानंतर तो करण शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दिवसअखेर मुंबईने पहिल्या डावात 87 षटकांत 5 बाद 260 धावा जमविल्या. तेमोरे एक षटकार आणि 6 चौकारांसह 51 तर मुलानी एक चौकारांसह 10 धावावर खेळत आहेत. उत्तर प्रदेशतर्फे करण शर्माने 39 धावांत 2 तर दयालने 35 धावांत 2 आणि मावीने 29 धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प. डाव 87 षटकांत 5 बाद 260 (जैस्वाल 100, शॉ 0, अरमान जाफर 10, सुवेद पारकर 32, सर्फराज खान 40, हार्दिक तेमोरे खेळत आहे 51 मुलानी खेळत आहे 10, करण शर्मा 2-39, दयाल 2-35, मावी 1-29).









