कार्डियाक सर्जन डॉ. मोहन गान यांची माहिती : द. भारतात केएलईची शस्त्रक्रियेसाठी निवड
बेळगाव : येथील डॉ. प्रभाकर कोरे ‘केएलई हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर’ने प्रथमच ‘पॉलिमर ट्राय मिट्रल व्हॉल्व’चे रुग्णांच्या हृदयावर रोपण केले आहे. मुख्य म्हणजे हा व्हॉल्व अमेरिकेतील फोल्डडॅक्सने 2016 मध्ये विकसित केला असून भारतात ‘डॉल्फीन लाईफ’ सायन्स एलएलपी’ने त्याचे उत्पादन केले आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ. मोहन गान यांनी दिली. डॉ. गान यांच्याच नेतृत्वाखाली नुकतीच रुग्णावर अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. या व्हॉल्वमुळे हृदयरोग विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण हा व्हॉल्व बसविल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रुग्णांना रक्त पातळ करणाऱ्या औषधांची गरज भासणार नाही. भारतातच उत्पादन झाल्याने याची किंमत कमी असल्याने रुग्णांना फायदा होणार आहे, असे हॉस्पिटलचे संचालक बी. दयानंद यांनी सांगितले.
सदर व्हॉल्वची संकल्पना 2016 मध्ये अमेरिकेत विकसित झाली. 2019 मध्ये रुग्णावर त्याचे रोपण करण्यात आले. 2024 मध्ये भारताला याचे एक केंद्र म्हणून निवडण्यात आले. संपूर्ण देशात दक्षिण भारतामध्ये केएलईची या शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली. हा व्हॉल्व पॉलिमर बेस्ड असून तो रोबेटिक तंत्रज्ञानाने तयार केला आहे. कार्डियाक विभागाने या शस्त्रक्रियेसाठी संशोधन करून अनेक चाचण्यांनंतर या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. डॉ. मोहन गान यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दर्शन, डॉ. गणाजय साळवे, डॉ. अभिषेक प्रभू, डॉ. पार्श्वनाथ पाटील, डॉ. रणजित नाईक व भूलतज्ञ डॉ. शरणगौडा पाटील यांनी शस्त्रक्रिया केली असून त्यांना ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. संजय पोरवाल, डॉ. सुरेश पट्टेद यांचेही सहकार्य लाभल्याचे दयानंद यांनी सांगितले. याबद्दल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.









