चांद्रयान-3 अवकाशयान मोहिमेला मोठे यश : अजून 18 दिवसांचा प्रवास बाकी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या वाटचालीत इस्रोला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ‘चांद्रयान-3’ने चंद्राची कक्षा पकडली असून आता चांद्रयान 166 किमी गुणिले 18 हजार किमीच्या कक्षेत फिरत आहे. सध्या ‘चांद्रयान-3’ने चंद्राची बाह्य कक्षा पकडली असून आता पुढील महत्त्वाचा टप्पा 17 ऑगस्टला आहे. तसेच 23 ऑगस्टला अवकाशयान चंद्रावर उतरणार असून अजून 18 दिवसांचा प्रवास बाकी आहे.
‘चांद्रयान-3’ने शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या कक्षेचा वेध घेण्यासाठी इस्रोने ‘चांद्रयान-3’साठी सुमारे 20 ते 25 मिनिटे थ्रस्टर्स चालू ठेवले. त्यामुळे चांद्रयान चंद्राच्या गुऊत्वाकर्षणात अडकले. आता ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत राहील. सध्या सुरुवातील ते चंद्राभोवती 166 किमी गुणिले 18,054 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. त्याचा वेग हळूहळू कमी करत चंद्राभोवती पाच कक्षा बदलल्या जातील. 6 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चांद्रयान 10 ते 12 हजार किलोमीटरच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तर, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 च्या सुमारास त्याची कक्षा 4 ते 5 हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाईल. 14 ऑगस्ट रोजी दुपारी चौथी कक्षा सुरू झाल्यानंतर ते 1,000 किलोमीटरपर्यंत कमी अंतरावर असेल. तर पाचव्या ऑर्बिट मॅन्युव्हरमध्ये, ते 100 किमीच्या कक्षेत ठेवले जाईल. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. 18 आणि 20 ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंग होईल. म्हणजेच चंद्राच्या कक्षेतील अंतर कमी होईल. लँडर मॉड्यूल 100 गुणिले 35 किमीच्या कक्षेत गेल्यानंतर 23 रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चांद्रयानचे लँडिंग केले जाणार आहे.
आता वेग सातत्याने कमी होणार
चंद्राची कक्षा पकडण्यासाठी चांद्रयान-3 चा वेग ताशी 3,600 किलोमीटर इतका वाढवण्यात आला. कारण चंद्राचे गुऊत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहापट कमी आहे. जर जास्त वेग असता तर चांद्रयानाने तो पार केला असता. त्यासाठीच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानचा वेग 2 किंवा 1 किलोमीटर प्रतिसेकंद इतका कमी केला. या वेगामुळे अवकाशयान चंद्राची कक्षा यशस्वीपणे गाठू शकले. आता हळूहळू चंद्राभोवतीच्या त्याच्या कक्षेतील अंतर कमी करून ते दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले जाईल.
इस्रोचा आनंद द्विगुणीत
शनिवार, 5 ऑगस्ट चांद्रयान-3 साठी खूप महत्त्वाचा ठरला. पूर्वनियोजित वेळेनुसार सर्व प्रणाली आतापर्यंत योग्यपणे सुरू असल्याचे इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी इस्रोचे शास्त्रज्ञ कसून प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञ पूर्ण निष्ठेने काम करत असून मिशन चांद्रयान-3 यशस्वी व्हावे, अशी प्रार्थना प्रत्येक देशवासीयही करत आहेत. चांद्रयान-3 च्या आतापर्यंतच्या कामगिरीने इस्रोची संपूर्ण टीमही उत्साहित आहे. मोहिमेच्या यशावर त्यांचा दृढ विश्वास आहे. 14 जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यापासून आतापर्यंत चांद्रयान-3 ची कामगिरी उत्कृष्ट राहिल्यामुळे भविष्यातही ते चांगले होईल, असा विश्वास इस्रोला वाटत आहे.
14 दिवस चालणार प्रयोग
चांद्रयान-3 मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहेत. अंतराळयानाला 100 किमी उंचीवर नेऊन 17 ऑगस्टला लँडिंग मॉड्यूल विभक्त केले जाईल. तर, 23 ऑगस्ट रोजी भारताचे अंतराळयान चंद्रावर उतरणार आहे. तेथे 14 दिवसांपर्यंत त्यांच्याकडून प्रयोग केले जातील. प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या किरणोत्सर्गाचे अध्ययन करेल. तसेच चंद्रावरील पृष्ठभागाचेही अध्ययनही इस्रोकडून केले जाणार आहे. चांद्रयान-3 चा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजे, हवा आणि पाण्याची स्थिती याचा शोध घेणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल अशाप्रकारे रोव्हरमधील साधनांची क्षमता सेट करण्यात आली आहे.









