‘सीपीआर’मधील हृदयविकार शस्त्रक्रिया विभागाचे यश : इचलकरंजीतील रूग्णाला जीवदान
कोल्हापूर प्रतिनिधी
इचलकरंजीतील तरूणाला सहा महिन्यांपासून धापेचा त्रास सुरू होता, त्याला डॉक्टरांनी ‘सीपीआर’मध्ये जाण्याचा सल्ला दिला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोगतज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी त्याची तपासणी केली, यामध्ये त्याच्या हृदयात तीन पाकळ्यांचे दुहेरी छिद्र झडपेमध्ये दिसून आला. त्यामुळे त्याच्यावर बिनटाक्याची डबल बलुन मायट्रल वोल्वोटॉमी शस्त्रक्रिया करून ‘सीपीआर’मधील डॉक्टरांना त्यांना जीवदान देण्यात यश आले आहे.
इचलकंजी येथील गरीब कुटुंबातील 29 वर्षीय तरूणाला सहा महिन्यांपासून धापग्रस्त व अतिशय थकवा जाणवला. त्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्याला इचलकंजीतील नामांकित डॉक्टरानी डॉ. अक्षय बाफना यांच्याकडे पाठवले. सीपीआर हॉस्पिटलमध्ये तो पुढील तपासणीसाठी आला. डॉ. अक्षय बाफना यांनी त्याची प्राथमिक तपासणी करून टुडी इको केला. त्यात तपासणीत त्याच्या हृदयाच्या झडपेला दुर्मीळ आजार होता. सर्वसाधारण माणसांच्या हृदयामध्ये तीन पाकळ्यांचे एकेरी छिद्र असणारी झडप असते, परंतु या व्यक्तीच्या हृदयामध्ये तीन पाकळ्यांचे दुहेरी छिद्र झडपेमध्ये होते. या आजाराला ‘डबल ऑर्फिस मिट्राल व्हेल्व वुईथ सर्व्ह स्टेनोसीस’ म्हणून ओळखले जाते.त्याच्या हृदयाच्या झडपेच्या क्षेत्राची रूंदी अतिशय छोटी होती.त्यामुळे हृदय, फुफ्फुसावर ताण येत होता. त्याला खूप त्रास होत होता. हृदयरोगतज्ञ डॉ. अक्षय बाफना, डॉ. अर्पित जैन यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून आजाराबाबत माहिती दिली. तसेच हा आजार अनुवंशिक व अधिग्रहित असण्याची शक्यता व्यक्त केली. डॉ. बाफना यांच्या नेतृत्वाखालील पथकांने बिनटाक्याची बलून मायट्रल वोल्वोटॉमी शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्याचा निर्णय घेतला.
रूग्णाचा अनुवंशिक आजार व अधिग्रहित व कमी वय आदी लक्षणांमुळे दोनदा बलून मायट्रल वोल्वोटॉमी शस्त्रक्रिया एकच सेटिंगमध्ये पार पडणे जोखमीचे होते. अगदी पायातल्या छोट्याशा रक्तवाहिनीतून बिनटाक्याची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत केली.सर्वसामान्य माणसांसारखे दुहेरी छिद्राला एकेरी छिद्र करून झडपेची रुंदी 0.5 सेंटीमीटरपासून वाढवत नेऊन 1.7 सेंटीमीटर करून ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून त्याला हृदयविकारमुक्त केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अक्षय बाफना, डॉ.अर्पित जैन, डॉ. गिरीश कांबळे, डॉ.मुल्ला, डॉ.पाटील, डॉ. देवरे, डॉ. विदुर कर्णिक, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, परिचारिका विभागप्रमुख मधुरा जावडकर, प्रिया माने, विद्या गुरव, श्रीकांत पाटील, पल्लवी खाडे, सुनिता वोनवर, रेखा पाटील, सायली पवार, सविता अनुसाये, अमृता मेधा, ओतारी आदींनी शस्त्रक्रिया यशस्वी केली.









