लाखो महिलांचा प्रवास : विद्यार्थिनी, नोकरदार, कामगारांना लाभ
बेळगाव : काँग्रेस सरकारने सत्तेत आल्यानंतर गॅरंटी योजना लागू केल्या. त्यामध्ये गृहलक्ष्मी, गृहज्योती, विद्यानिधी, शक्ती, अन्नभाग्यचा समावेश आहे. यापैकी शक्ती योजना सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले. 11 जून 2023 पासून महिलांच्या मोफत प्रवासाला प्रारंभ झाला. आजतागायत बेळगाव विभागातून कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शक्ती योजनेंतर्गत राज्यात महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. त्यामुळे महिलांचा बस प्रवास सुसाट सुरू आहे. योजनेच्या सुरुवातीला महिलांनी अनेक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थळांना भेटी दिल्या. दरम्यान, महिलांची बसना प्रचंड गर्दी वाढली होती. चेंगराचेंगरी करत प्रवासाला सामोरे जावे लागत होते. यातून अनेक वेळा महिलांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले. विशेषत: शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला. बसची कमतरता असलेल्या आगारांमध्ये बसचे नियोजन करताना परिवहनची डोकेदुखी वाढली. मात्र, दुसरीकडे महिलांचा मोफत प्रवास मात्र अनेकांना आधार देणारा ठरला.
विद्यार्थिनींना दिलासा
शक्ती योजनेंतर्गत सर्व वर्गातील विद्यार्थिनींना माफेत प्रवास दिला जात आहे. अंगणवाडीपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या प्रवासाचा लाभ घेता येत आहे. विशेषत: बसपास काढण्याची कटकट थांबली. शिवाय आर्थिक भारही कमी झाला आहे. केवळ शिक्षणासाठीच नाही तर इतर ठिकाणीही विद्यार्थिनींना मोफत प्रवास करता येत आहे.
नोकरदार, कामगार महिलांना सोयीस्कर
जिल्ह्यात नोकरी आणि कामासाठी ये-जा करणाऱ्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे या महिलांना शक्ती योजना सोयीस्कर ठरू लागली आहे. दररोज नोकरी आणि कामानिमित्त बेळगाव, निपाणी, चिकोडी, हुक्केरी, यमकनमर्डी, सौंदत्ती, खानापूर आदी मार्गांवर प्रवास करणाऱ्या महिला आहेत. या सर्व महिलांना शक्ती योजना शक्ती देणारीच ठरू लागली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिला ‘शक्ती’वर
ग्रामीण भागातील महिलांनाही शक्ती योजनेचा मोठा लाभ होऊ लागला आहे. शहरात बाजार, भाजीविक्री आणि इतर कामांसाठी येणाऱ्या महिलांना शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास करणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे खासगी वाहनांपेक्षा महिलांची बसलाच अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. आधारकार्ड दाखवून महिलांचा हा मोफत प्रवास सुरू आहे.
योजनेचा लाभ कोट्यावधींना
शक्ती योजना सुरू होऊन वर्ष पूर्ण झाले. सुरुवातीच्या काळात गोंधळ उडाला. मात्र, वर्षभर महिलांना सोयीस्कर प्रवास दिला जात आहे. वर्षभरात कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यात हा प्रवास सर्वत्र मोफत सुरू आहे. विद्यार्थिनींसह सर्वसामान्य महिलांना लाभ होत आहे.
-के. के. लमाणी, डीटीओ, बेळगाव









