बेळगाव : भूतान येथे साऊथ एशियन शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर, व्यंकटेश ताशिलदार व व्ही. बी. किरण यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकावित बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे खास सत्कार करण्यात आला. स्वरुप, नर्तकी थिएटरमध्ये बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभ प्रसंगी उद्योगपती दिलीप चिटणीस, शिरीश गोगटे, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, अविनाश पोतदार, मारुती देवगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भूतान येथे झालेल्या या स्पर्धेत वयस्करांच्या 70 किलो गटात प्रताप कालकुंद्रीकरने सुवर्णपदक, 65 किलो गटात व्यंकटेश ताशिलदारने रौप्यपदक तर 85 किलो वजनी गटात व्ही. बी. किरणने कांस्यपदक पटकावित घवघवीत यश संपादन केले.
एशियन शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावला प्रथमच तीन पदके मिळाली आहेत. कर्नाटक संघात या तिघांची निवड करण्यात आली होती. या तिघांनीही पदके पटकावित बेळगावचे नाव शरीरसौष्ठवमध्ये उज्ज्वल केले आहे. त्याबद्दल त्यांचा खास मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्योजक दिलीप चिटणीस यांनी या तिन्ही खेळाडूंना स्पर्धेला जाण्यापूर्वी आर्थिक मदत केली होती. या तिघांनी आपल्या कठोर परिश्रमामुळे बेळगावला पदके मिळवून दिली आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. शिरीष गोगटे, रमेश गोरल व अविनाश पोतदार यांनी या तिघांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर एम., हेमंत हावळ, एम. के. गुरव, सुनील राऊत, सुनील अष्टेकर, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, राजू नलवडे, बसवराज अरळीमट्टी, नूर मुल्ला, गणेश गुंडप, गजानन हंगिरगेकर, आकाश हुलीयारसह आदी सभासद उपस्थित होते.









