कुडाळ / प्रतिनिधी
बहुउद्देशीय मजूर यंत्र प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक
नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ( सन २०२२-२३) कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायाच्या विद्यार्थी प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक पटकावला. लखन अनिल मेस्त्री या विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेने बनविलेल्या बहुउद्देशीय मजूर यंत्र या प्रतिकृतीने हे यश संपादन केले. या प्रतिकृतीची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.या यशाबद्दल लखन व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
लखन मेस्त्री या विद्यार्थ्याने बहुउद्देशीय मजूर यंत्र तयार केले. तुळसुली येथे लिंगेश्वर विद्यालयात यावर्षीच्या कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून विद्यार्थी प्रतिकृती म्हणून लखन याची सदर प्रतिकृती मांडण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात सदर उपकरण फायदेशीर असल्याने ते लक्षणीय ठरले.या तालुका स्तरावर त्याच्या या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक मिळविला होता.नंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ही या प्रतिकृतीने प्रथम क्रमांकावर बाजी मारत राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी पात्र ठरली होती. या तालुका व जिल्हा स्तरावरील प्रदर्शनात लखन याच्या सोबत त्याचा सहायक म्हणून जतीन वेंगुर्लेकर हा विद्यार्थी सहभागी झाला होता.तर या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक विलास राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र शासन व विज्ञान – गणित शिक्षण संस्था ( रविनगर – नागपूर ) यांच्यावतीने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. लखन या प्रदर्शनात मार्गदर्शक शिक्षक विलास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रतिकृती घेऊन उतरला. यात या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्र राज्याची प्रतिकृती म्हणून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात झळकण्याचा मान या प्रतिकृतीला मिळाला आहे. लखन याला मुख्याध्यापक सुनील भाटीवडेकर व विज्ञान शिक्षक श्री राठोड यांचे मार्गदर्शन लाभत आहे,तर विज्ञान शिक्षक सहदेव भोई व अनिल वारंग यांचे सहाय मिळत आहे.या यशाबद्दल या विद्यालयाच्या शाळा समितीच्यावतीने चेअरमन के.के.वारंग ,जॉइंट सेक्रेटरी ए.पी.वारंग ,मुख्याध्यापक श्री.भाटीवडेकर ,हिंदी विषयाचे शिक्षक रामदास गावडे तसेच सस्था पदाधिकारी व संचालक , पालक ,ग्रामस्थ ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी लखन व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन केले.









