जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : केएलई इन्डिपेंडंट कॉलेजमध्ये ओरिएंटेशन प्रोग्रॅम
बेळगाव : कोणतेही यश हे सहज सोप्या पद्धतीने मिळत नाही. युपीएससी करताना प्रत्येक टप्प्यावर नवी संकटे येत असत. परंतु मेहनत योग्य दिशेने असल्यास मार्ग सापडतोच. कठोर परिश्रम आणि सातत्य असेल तर यश मिळतेच, असा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला. केएलई इन्डिपेंडंट पीयू कॉलेजच्यावतीने सोमवारी जेएनएमसीच्या जिरगे सभागृहात ओरिएंटेशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, संस्थेचे सदस्य महांतेश कवटगीमठ, प्राचार्य वेणुगोपाल रेड्डी, डॉ. मल्लिकार्जुन होते. डॉ. कोरे म्हणाले, नीट परीक्षेमुळे सात-आठ वर्षात अभ्यासक्रमात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा करावी लागते. परंतु पालकवर्ग विद्यार्थ्यांवर आपली स्वप्ने लादत आहेत.
पालकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थी मानसिक आजारांना बळी पडत आहेत. आपल्याला आवडते ते क्षेत्र सोडून पालकांच्या इच्छा पूर्ण करण्यातच त्यांचे उमेदीचे वय निघून जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार शिकण्याची संधी द्या, मेडिकल आणि इंजिनियरिंग क्षेत्रे सोडून इतरही महत्त्वाचे अभ्यासक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. महांतेश कवटगीमठ म्हणाले, केएलई कॉलेजतर्फे उत्तम शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांची कॉलेजला पसंती आहे. निरंतर अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. आपण कोणत्या धर्मात, जातीत, कोणत्या आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलो हे आपल्या हातात नसले तरी कोणते यश मिळवायचे हे आपल्या हातात असल्याने प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मायाप्पा पाटील व ऐश्वर्या कांबळे यांनी केले, रुतू पाटील यांनी आभार मानले.









