तीन वर्षांचा संघर्ष, अखेर पारंपरीक वाट मोकळी
वास्को ; वेलसांव गावातील एका अपंग युवकाला अखेर न्याय मिळाला. त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची पारंपरीक वाट खुली करून देण्यात आली. मागच्या तीन वर्षांपासून कुबड्यांचा आधार घेऊन या युवकाने आपली वाट खुली करून द्यावी या मागणीसाठी शासकीय दरबारी बराच संघर्ष केला होता. अखेर त्याच्या संघर्षाला यश आले.
वेलसांवच्या दांडो गावातील दुमिंगो गोयस या 44 वर्षीय युवकाला अपंगत्वामुळे आपल्या पायावर उभे राहता येत नाही. त्याचे दोन्ही पाय लुळे आहेत. कुबड्यांच्या आधारेच त्याने आतापर्यंतचे जीवन ढकलले आहे. अशाही परिस्थितीत त्याने रोजीरोटी कमावण्यासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि रिक्षातून माशांची वाहतुक करू लागला. त्यातून त्याला काही पैसे मिळू लागले. मात्र, काही वर्षांपूर्वी त्याच्या घरासमोरील वाट बंद झाली आणि त्याचा धंदाही बंद पडला. घरासमोरल मोकळ्या जागेतून त्याच्या घरासाठी तसेच अन्य घरांसाठी पारंपरीक वाट होती. त्यातून चार चाकीही ये जा करीत होती. मात्र, एका नागरिकाने त्याच्या घरासमोरील मालमत्ता विकत घेतल्यानंतर त्याच्या वाटेवर अतिक्रमण झाले. वाट बंद झाल्याने सर्वात मोठी अडचण या अपंग युवकाची झाली. त्याला घरातून रस्त्यापर्यंत येण्यासाठी कष्ट सोसावे लागले.
आपल्या पारंपरीक वाटेवर झालेले अतिक्रमण हटवीण्यात यावे यासाठी कुबड्यांच्या आधारेच त्या युवकाने संघर्ष सुरू केला. मागच्या तीन वर्षांहून अधिक काळ त्याने राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिझवीले. मामलेदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याच्या वाटेचा प्रश्न ताटकळत पडला होता. अखेर काल शुक्रवारी त्याच्या संघर्षाला यश आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याच्या पारंपरीक वाटेवरील अतिक्रमणे हटवीण्यात आली. पोलीस संरक्षणात ही कारवाई झाली. त्याचा रस्ता मोकळा करण्यात आला. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. एक चार चाकीही त्याने या रस्त्यावरून फिरवली व आनंद व्यक्त केला. या कामी त्याला गोवा राज्य अपंगत्व आयोगाच्या पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभले.









