5 दिवसांपासून सुरु आहे मोहीम : 1 हजार जवान तैनात : ड्रोनची घेतली जातेय मदत
वृत्तसंस्था/ बस्तर
छत्तीसगडच्या बस्तर येथील बीजापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये नक्षलवादाच्या विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. येथे शेकडो नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आहे. भीषण उष्णता आणि चार दिवसांपेक्षा अधिक काळापर्यंत चाललेल्या मोहिमेत आतापर्यंत 40 हून अधिक जवान डिहायड्रेशनचे शिकार ठरले आहेत. या जवानांना तेलंगणातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांना शांतता चर्चा करण्यासाठी सरकारने ही मोहीम रोखावी अशी मागणी केली आहे. यापूर्वी जवानांनी तीन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. येथे सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा हस्तगत केला आहे.
छत्तीसगड आणि तेलंगणातील पोलीस अन् सुरक्षा दलांचे 1 हजार जवान या मोहिमेत सामील आहेत. या भागात हिडमा, देवा आणि दामोदर यासारख्या नक्षलवादी म्होरक्यांना सुरक्षा दलांनी घेरले आहे. या मोहिमेद्वारे नक्षलवाद्यांच्या मोठ्या शक्तीला संपविण्यास यश येणार असल्याचे मानले जातेय.
नक्षलवाद्यांकडुन कारवाई रोखण्याची मागणी
नक्षलवाद्यांनी शुक्रवारी एक वक्तव्य जारी करत सरकारने वर्तमान मोहीम त्वरित रोखावी अशी मागणी केली आहे. आम्ही शांतता चर्चा सुरू करण्याचा पुढाकार घेतला होता, परंतु सरकार हिंसेचा मार्ग निवडत असल्याचा कांगावा नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांचा कमांडर रुपेशने एक महिन्यासाठी संघर्षविरामाचे आवाहन केले आहे.
500 हून अधिक नक्षलवादी जाळ्यात
संबंधित भागात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आहे. यात नक्षलवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर वनचा कमांडर हिडमा, देवा आणि दामोदरचाही समावेश आहे. पीएलजीए नक्षलवाद्यांची सर्वात मजबूत सशस्त्र संघटना आहे. तर सुरक्षा दलांच्या मोहिमेत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, बस्तर फायटर्स आणि छत्तीसगड पोलीस विभागाचा स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ आणि कोब्राचे जवान सामील आहेत. नक्षलवाद्यांची सशस्त्र शक्ती संपविण्याची ही लढाई असून यात पीएलजीए बटालियन नंबर वन आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी तेच तेलंगणा राज्य कमिटीच्या नक्षलवादी थिंक टँकला लक्ष्य करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेलिकॉप्टर, ड्रोनचा वापर
सुरक्षा दलांच्या या मोहिमेत हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. याच्या मदतीने जवानांना पाणी आणि अन्न पुरविले जात आहे. तसेच थकलेल्या आणि डिहायड्रेटेड जवानांना सुरक्षित स्थानी पोहोचविण्यात येत आहे. काही जवानांना हीटस्ट्रोकमुळे तेलंगणाच्या रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मोहीम सुरू असलेला भाग पर्वतीय असून येथील तापमान कमाल 44 अंश सेल्सिअसवर पोहोचत आहे, तसेच ऑक्सिजनची पातळीही अत्यंत कमी आहे. तरीही जवान मागील 3-4 दिवसांपासून पायी चालत पुढे जात आहेत. स्वत:सोबत 30-35 किलोग्रॅम वजनाची शस्त्रास्त्रs, दारुगोळा, भोजन आणि पाणी घेत धोकादायक मार्ग आणि घनटाट जंगलांमधून मार्गक्रमण करत आहेत.
निर्णायक लढाई
बस्तरचे पोलीस महासंचालक पी. सुंदरराजन यांनी या मोहिमेला नक्षलवादाच्या विरोधातील निर्णायक लढाई ठरविले आहे. सुरक्षा दलांना करेगुट्टा, कोतापल्ली, पुजारी कांकेर आणि नादापल्लीच्या आसपास तैनात करण्यात आले आहे. हा भाग ऐतिहासिक स्वरुपात नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. नक्षलवादी हे एके-47, एसएलआर, एलएमजी, हँडग्रेनेड आणि रॉकेट लाँचर यासारख्या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत. तसेच त्यांनी वाटेत अनेक आयईडी पेरून ठेवले आहेत.
सलग 4-5 दिवसांपासून घेरले
नक्षलवाद्यांनी तयारी करून ठेवली असली तरीही त्यांच्याकडे आता सामग्रीची टंचाई निर्माण होत आहे. सुरक्षा दलांनी पुजारी कांकेर, नांबी आणि वेंकटपुरम येथून येणारी त्यांची रसद तोडली आहे. यामुळे नक्षलवाद्यांना भोजन आणि पाण्याच्या कमतरतेला तोंड द्यावे लागत आहे.









