मध्यप्रदेशमधील दोघा अट्टल चोरट्यांना अटक
बेळगाव : सरस्वतीनगर-गणेशपूर येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. मध्यप्रदेशमधील दोघा आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याजवळून 11 लाख 83 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली पॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, उद्यमबागचे उपनिरीक्षक किरण होनकट्टी, हवालदार बसवराज उज्जीनकोप्प, जे. एस. लमाणी, एच. वाय. विभुती, संतोष बरगी, एम. एस. लमाणी, आर. एस. अक्की आदींचा समावेश असलेल्या पथकाने आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वखारअहमद अन्वर शेख (वय 36), शुभम भगवानसिंग मुछाला (वय 23) दोघेही राहणार मध्यप्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सरस्वतीनगर-गणेशपूर येथील अँथोनी डिक्रूस यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 17 लाख 28 हजार रुपये किमतीचे दागिने व 40 हजार रुपये रोख चोरट्यांनी पळविली होती. अँथोनी डिक्रूस हे 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता आपल्या घराला कुलूप लावून राजस्थानमधील मुलीच्या घरी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली होती. आंतरराज्य टोळीतील गुन्हेगारांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी या जोडगोळीच्या मुसक्या आवळून मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांनी ही माहिती दिली आहे.









