‘तरुण भारत’मधील वृत्तामुळे लागला शोध
बेळगाव : ज्योतीनगर, गणेशपूर येथून बेपत्ता झालेल्या बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या सदस्या शिला काशिनाथ सांबरेकर यांच्यासह पती आणि दोन मुलींचा शोध घेण्यात कॅम्प पोलिसांना बुधवार दि. 18 रोजी यश आले आहे. बेपत्ता प्रकरणी ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी पाहून काहींनी ही माहिती पोलिसांना दिल्याने त्यांचा तपास लावण्यात पोलिसांना मदत झाली आहे. शिला या बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या सदस्या असून त्या कर्जबाजारीपणामुळे सोमवार दि. 16 रोजी आपला पती काशिनाथ, मुलगी सानिका आणि प्राजक्ता यांच्यासोबत कोणालाही न सांगता घरातून बाहेर गेल्या होत्या.
त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. पोलिसांनी बेपत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊन चौघांचेही फोटो व माहिती प्रसिद्धीस दिल्याने याबाबत तरुण भारतमधून सविस्तर वृत्त प्रसिद्धीस आले. वरील चौघे जण बुधवारी सकाळी 10 च्या दरम्यान मारिहाळकडून सुळेभावी महालक्ष्मी मंदिरकडे जात असताना काहींच्या नजरेस पडले. त्यामुळे संबंधितांची माहिती कॅम्प पोलिसांना देण्यात आली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांना पुन्हा ज्योतीनगर येथील घरी जाऊ देण्यात आले.









