कोल्हापूर / इम्रान गवंडी :
शहराच्या उपनगरात मोकाट घोड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे घोडे रस्त्यावर ठाण मांडत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भटक्या कुत्र्यांपाठोपाठ आता मोकाट घोड्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून मूळ मालकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.
उपनगरातील गल्लोगल्ली कळपाने फिरणाऱ्या घोड्यांची दहशत वाढली आहे. घोड्यांच्या जवळून चालताना सावधगिरीने जावे लागत आहे. गल्लोगल्ली फिरणाऱ्या मोकाट घोड्यांमुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील घोड्यांना चुकवण्याच्या नादात झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत थेट घोड्यांच्या मालकांवर कारवाई केली होती. त्यानंतर ही घोडी दिसेनाशी झाली होती. आता पुन्हा मोकाट घोड्यांचा संचार वाढला आहे.
मोकाट घोडे पूर्वीपासूनच समस्या निर्माण करत आहेत. पण अलीकडच्या काळात घोड्यांची संख्या वाढली आहे. मालकांकडून ही घोडी दिवसभर सोडली जातात. सायंकाळ झाली की मालक त्यांना ताब्यात घेतात. मोकाट घोडी सोडणाऱ्या अशा मालकांवर काठोर कारवाई होणे गरजचे आहे. घोडे रस्त्यावर बसले की वाहने थांबवावी लागतात. हॉर्न वाजवूनही ती घोडी हटत नाहीत. काहीवेळा घोडी अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.
- पूर्वी झालेले घोड्यांचे हल्ले
काही महिन्यांपूर्वी साने गुरूजी वसाहत प्रभागातील देवणे कॉलनी येथे एका नागरिकाच्या जनावराच्या गोठ्याचे मोकाट घोड्यांनी नुकसान केले होते. गोठ्यात असणाऱ्या वासराला या घोड्यांनी फरफटत नेऊन त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला होता. यापाठोपाठ घोड्यांनी येथील वृद्धेवर रात्रीच्यावेळी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला एका घोड्याने लाथाडल्याने एकजण गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यात त्याच्या छातीच्या बरकड्यांना इजा झाली होती.
- नुकसान भरपाई देणार कोण?
मोकाट घोड्यांमुळे अपघात घडत आहेत. काहीवेळा घोडी नागरिकांवर हल्ला करत आहेत. यामध्ये जखमी अथवा वाहनाचे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देणार कोण? असा प्रश्न केला जात आहे.
- या भागात घोड्यांचा संचार
साने गुरूजी वसाहत, राजोपाध्येनगर, बिडी कामगार वसाहत, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, फुलेवाडी, बोंद्रेनगर, आपटेनगर, देवणे कॉलनी, पाचगव, आरकेनगर, राजेंद्रनगर, आयसोलेशन आदी भागात मोकाट घोड्यांचे कळप दिसतात.
- काय आहे कारण?
हे घोडे मालकांनी सोडलेले आहेत. असे असतानाही महापालिकेकडून घोड्यांना पकडण्यासाठी कोणतीही मोहीम राबवली जात नाही. मोकाट प्राण्यांसाठी नियम आहेत, पण अंमलबजावणी शून्य असल्याचे दिसून येत आहे. घोड्यांमुळे झालेल्या अपघतात महिलेचा मृत्यू झाल्याने या समस्येची गांभीर्यता वाढली आहे.
- घोड्यांचा त्रास वाढला
रस्त्यावर घोडे दिसले की मुले घाबरतात. कुत्र्यांच्या दहशती पाठोपाठ आता मोकाट घोड्यांचाही त्रास होत आहे. गल्लोगल्ली फिरणारी घोडी दारासमोरच ठाण मांडत आहे. महापालिकेने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. त्यांनी पकडून अन्यत्र सोडावे, अशी मागणी होत आहे.
- बंदोबस्त करावा
परिसरात मोकाट घोड्यांची संख्या वाढत आहे. प्रमुख मार्गावर कळपाने उभी असलेली घोडी कितीही हॉर्न वाजवला तरीही बाजूला हटत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यांच्या समोरून जाताना दहशतीनेच जावे लागते. अनेकवेळा उधळलेली घोडी गल्लीबोळांतून धावत सुटतात. त्यामुळे त्यांची भिती कायम आहे. प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा.
– मुकूंद परदेशी, नागरिक








