कोल्हापूर :
पावसाळा आणि रस्त्यात खड्डे असे समीकरणच तयार झाले आहे. उपनगरातील रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात पाण्याचे डबके दिसणारे दरवर्षीचे चित्र आहे. यंदाचा पावसाळा सुद्ध त्याला अपवाद नाही. उपनगरातील प्रत्येक रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत आणि त्यातूनच नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरु आहे.
कोल्हापूरातील रस्त्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. पण त्या निधीतून केलेल्या रस्त्यांची कामे दिसत नाही. यंदाही रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीचा गवागवा करण्यात आला. मात्र सध्या कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था बघितल्यास रस्ते शोधण्याची वेळ आली आहे. तर रस्त्यांचा दर्जा हा संशोधनाचा भाग आहे. मुख्य शहरातील रस्त्यांना काही प्रमाणात डांबर पुसले तरी जाते. मात्र उपनगरातील रस्त्यांना वर्षानुवर्षे डांबर लागतच नाही.
रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात आणि शहराच्या बाजूंनी सिमेंट आणि डांबरी असे रस्ते करण्यात आले होते. त्यापैकी शहराभोवतीचे सिमेंटचे रस्ते बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. तर ज्याठिकाणी युटिलिटीसाठी सिमेंटच्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली ते खराब झाले आहेत. मात्र प्रकल्पातील रस्त्याशिवाय उपनगरातील अन्य रस्त्यांची अवस्था कायमच दयनीय आहे. सुभाषनगर ते शेंडापार्क, शेंडापार्क ते एसएसी बोर्ड, शेंडापार्क ते आर.के.नगर जकात नाका, एसएसएसी बोर्ड ते मोरेवाडी नाका, टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते मार्केट यार्ड, लोणार वसाहत, राजोपाध्ये नगर ते बोंद्रेनगर रोड या उपनगरातील रस्त्यांमध्ये प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत.
ऑक्टोबरनंतर या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करता आले असते. पण दप्तर दिरंगाई आणि अन्य कारणांने हे रस्ते झालेच नाहीत. त्याचे परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागत आहेत. उपनगरातील या प्रत्येक रस्त्यांमध्ये नुसते खड्डेच पडले नाहीत तर रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना कोणता खड्डा चुकवून पुढे जायचे असा प्रश्न पडत आहे .तरीही खड्डा चुकवता येत नाही. एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात गाडी हमखास जाते. यामुळे वाहनांची कामे निघतातच पण मणक्यासारखी दुखणी वाढत आहेत.
- महापालिकेकडून केवळ मलमपटी
उपनगरातील या रस्त्यांमध्ये पावसाळ्यात किंवा पावसाळयानंतरही खड्डे पडतात हे महापालिकेला माहित आहे. मात्र महापालिकेकडून रस्त्यांचे डांबरीकरण केले जात नाही तर पॅचवर्क केले जाते. पॅचवर्कचे काम म्हणजे कुठे तरी डांबर आणि त्यामध्ये मोठी खडी, क्रशर ओतले जाते. यामुळे ते पॅचवर्क दोन दिवसातच निघून जाते. यानंतर पुन्हा मुरुम आणि मातीचे पॅचवर्क केले जाते. ते सुध्दा काही दिवस राहते. यामुळे पॅचवर्क करण्यातच महापालिका धन्यता मानते. ज्या ठेकेदाराला हे कामे दिले जाते त्याला या कामाबद्दल जबाबदार धरले जात नाही. तर कोणी विचारणारे नसल्यामुळे वर्षानुवर्षे पॅचवर्कचा खेळ सुरु आहे. त्रास मात्र सर्वसामान्य जनेतला सहन करावा लागत आहे.
- पावसाळा झाला की खोदाई
पावसाळा संपला की दिवाळीनंतर रस्ते कामे केली जातात. पण इकडे रस्त्यांची कामे करण्यात येत असतानाच दुसऱ्या बाजूला वेगवेगळया पाईपलाईन, केबल्स टाकण्यासाठी खोदाई करण्यात येते. यामुळेही रस्ते कायमच खड्ड्यात असतात.
- रस्त्यांचे दुखणे कायम
शहर आणि उपनगरातील एकही रस्ता धड नाही. उपनगरातील रस्त्यांची चाळण झाली तरी त्याकडे कोणाकडूनच लक्ष दिले जात नाही. कोणताही ऋतू असला तरी उपनगरातील नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यांना कोणी वाली नाही. मुळातच विविध कर भरुन वाहनधारक मेटाकुटीला येत असताना खड्डेयुक्त रस्त्यामुळे आणखी खर्च वाढत आहे.
-राजू शिवशरण- रिक्षा चालक








