4651 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन : शेततळ्यांना प्राधान्य
बेळगाव : शरीरात भरपूर ऊर्जा मिळवून देणाऱ्या मत्स्यपालनाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे साहजिकच मत्स्योत्पादनात भरीव वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध तलाव, जलाशयातून 4 हजार 651 टन उत्पादन झाले आहे. जलसंपदा योजनेची जोड मिळत असल्याने मत्स्य व्यवसाय वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पडीक जमिनीतदेखील मत्स्यपालनाला पसंती दिली जात आहे. त्याबरोबर शेततळे, नदी, कालवे, पाझरतलाव आदी ठिकाणी मत्स्यपालन होऊ लागले आहे. त्यामुळे माशांचे उत्पादन वाढले आहे. हिडकल, राकसकोप, नवलतीर्थ जलाशय, घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा, मार्कंडेय या नद्यांमधूनदेखील मत्स्यबीज सोडले जात आहे. त्यामुळे अलीकडे मत्स्योत्पादनात वाढ होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार मेट्रिक टनने वाढ झाली आहे.
विशेषत: पावसाळ्यात मत्स्यतलाव पूर्ण क्षमतेने भरतात. यावेळेत मत्स्यबीज सोडले जाते. यंदादेखील पावसाळी हंगामात मत्स्यबीज सोडले जाणार आहे. खात्याच्या हिडकल येथील कार्यालयात मत्स्यबीज उपलब्ध करण्यात आले आहे. विशेषत: राहू, गिरमल, मृगळ आणि कटला जातीचे मत्स्यबीज दिले जाणार आहे. अलीकडे शेततळ्यांची संख्या वाढली आहे. रोजगार हमी अंतर्गत शेतात तलावांची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या तलावातून मत्स्योत्पादनाला प्राधान्य दिले जाते. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील आणि महिलांसाठी 60 टक्के तर सामान्य नागरिकांसाठी 40 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे मत्स्यपालकांची संख्या वाढू लागली आहे. मत्स्य खात्याकडून मत्स्य पालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय हिडकल आणि मलप्रभा जलाशयात मासे पकडण्यासाठी परवानगीदेखील दिली जात आहे. पडीक जमिनीत शेततलावांची निर्मिती होऊ लागली आहे. या तलावातून मत्स्योत्पादन केले जात आहे. त्यामुळे एकूणच मत्स्योत्पादनात वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील 160 तलावातून तब्बल 5 हजार 460 टन मत्स्योत्पादन झाले आहे. तर कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा या नद्यांमधून 300 टन व शेततळ्यातून 20 हजार 560 टन उत्पादन झाले आहे.









